
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई मदत (DR) चा अतिरिक्त हप्ता देण्यास मान्यता देण्यात आली. 1 जानेवारी 2025 पासून लागू होणारी ही सुधारणा DA आणि DR मध्ये 2 टक्क्यांनी वाढ करणार आहे. या निर्णयामुळे सध्याचा दर 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर पोहोचणार आहे.
सध्या महागाईने जनता होरपळत आहे. या महागाईची झळ कमी करण्यासाठी आणि सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार आहे आणि DA आणि DR सुधारणांसाठी स्थापित सूत्राचे पालन करते.
मंजूर झालेल्या वाढीचा फायदा अंदाजे 48.66 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 66.55 लाख निवृत्तीवेतनधारकांना होईल. DA आणि DR वाढीचा सरकारी तिजोरीवर एकूण आर्थिक परिणाम 6,614.04 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे.
सुधारित DA आणि DR हे येत्या पगार आणि पेन्शन वितरणात समाविष्ट केले जातील, ज्याची थकबाकी 1 जानेवारी 2025 पासून देय असेल.
सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या कमाईचे योग्य मूल्य राखण्यासाठी चलनवाढीच्या ट्रेंड आणि किंमत निर्देशांकांवर आधारित DA आणि DR दरांमध्ये वेळोवेळी सुधारणा करत असते.