
एअर इंडियाच्या विमानात बसायला तुटलेली खुर्ची मिळाल्याने केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संताप व्यक्त केला. भोपाळहून दिल्लीला जाताना घडलेल्या प्रकाराचा दाखला देत त्यांनी विमान प्रवासात आलेला वाईट अनुभव ‘एक्स’च्या माध्यमातून शेअर केला. एअर इंडियाच्या फ्लाइट एआय 436 चे तिकीट काढले होते. आठव्या सीटवर मी बसलो होतो, पण सीट पूर्णपणे तुटलेली आणि खचलेली होती. त्यावर बसणे त्रासदायक होते, अशी व्यथा चौहान यांनी मांडली.
‘विमानातील कर्मचाऱ्यांना खराब सीटबद्दल विचारले असता त्यांनी इतरही काही सीट्स अशाच असल्याचे सांगितले. तसेच या खराब सीटच्या तिकिटाची विक्री करू नका असे व्यवस्थापनाला आधीच सांगितले होते असे उत्तर मिळाले. इतर प्रवाशांनी मला त्यांच्या जागेवर बसण्याचा आग्रह केला, मात्र इतरांना त्रास नको म्हणून याच तुटलेल्या सीटवरून प्रवास केला. टाटांच्या हातात एअर इंडियाचे व्यवस्थापन गेल्यानंतर तरी एअर इंडियाची सेवा चांगली असेल, मात्र हा माझा भ्रम होता’, असेही शिवराज सिंह यांनी नमूद केले.
शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगावरून एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. असुविधेबद्दल खेद आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे एअर इंडियाच्या हँडलवरून सांगण्यात आले.