मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आधीच अडचणीत असलेले महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मिंधे सरकारमध्ये कृषीमंत्री असताना मुंडे यांच्या कार्यकाळात झालेल्या पीकविमा घोटाळ्याची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्रातील पीकविमा घोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्राच्या विद्यमान कृषीमंत्र्यांनी पीकविमा योजनेत 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा 5 हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहिती होती का? आणि असेल तर या घोटाळ्याचे चौकशीचे आदेश केंद्र सरकार देणार का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. या प्रश्नाला शिवराजसिंह चौहान यांनी सकारात्मक प्रतिसाद देत घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश दिले जातील असे स्पष्ट केले. यामुळे धनंजय मुंडे आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
घोटाळेबाजांना सोडणार नाही
महाराष्ट्रात असा काही घोटाळा झाला आहे याची माहिती मला आताच खासदार सुळेंकडूनच कळली आहे. आमचे सरकार हे शेतकऱ्यांप्रती कटिबद्ध आहे. जर असा काही घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. चौकशीत कोणी दोषी आढळले तर घोटाळेबाजांना सोडणार नाही, असे शिवराजसिंह चौहान यांनी स्पष्ट केले.