उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू, काय आहेत वैशिष्ट्यै जाणून घ्या

उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. समान नागरी कायदा लागू करणारा उत्तराखंड हे पहिले राज्य ठरणार आहे. आज दुपारी साडे बारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभुमीवर या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे.

समान नागरी कायदा हा संपूर्ण उत्तराखंडमध्ये लागू होणार असून राज्यातील प्रत्येक नागरिकाला हा कायदा लागू होणारच आहे. तसेच राज्याबाहेर राहणाऱ्या राज्यातील नागरिकालासुद्धा ह कायदा लागू होणार आहे. या कायद्यामुळे बंधुभाव असलेला समाज, जाती धर्माचे, लिंग आणि समाजाचे भेदभाव दूर होण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केले.

तसेच जनतेला दिलेली वचनं आम्ही पूर्ण करत आहोत. कलम 370 हटवणार असे आम्ही वचन दिले होते आणि आम्ही ते पूर्ण केले. हा निर्णय घेतल्यानंतर देशातली जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असेही धामी म्हणाले.

उत्तराखंडच्या समान नागरी कायद्याचे वैशिष्ट्यै

मुला मुलींना संपत्तीत समान वाटा
समान नागरी कायद्यात मुलाला आणि मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देण्य़ात आला आहे.

लग्नाबाबात तरतूद
उत्तराखंडच्या समान नागरी कायद्यानुसार राज्यात कुणीही दोन लग्न करू शकत नाही. लग्न करण्यासाठी मुलाचे वय 21 तर मुलीचे वय 18 असणार आहे. लग्न हे धार्मिक प्रथानुसार होईल आणि लग्नाची नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे.

औरस आणि अनौरस संतती:
समान नागरी कायद्यानुसार कुठलीही संतती ही अनौरस ठरणार नाही. जी संतती ज्या माता पित्यांची असेल त्या माता पितांना आपल्या संततीला आपल्या संपत्तीचा वाटा द्यावाच लागेल.

दत्तक मुलांचे हक्क
एखाद्या दाम्पत्याने एखादे मुल दत्तक घेतले असेल, किंवा सरोगसीद्वारे त्याचे पालकत्व स्विकारले असेल तर सख्ख्या मुलांएवढेच हक्क त्या मुलांनादेखील असतील.