
देशभरात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. पदवी हातात असूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे तरुण हतबल झाला आहे. याचा प्रत्यय पोलीस भरतीत येत आहे. नाशिकमधील पोलीस भरतीसाठी बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले हजारो उमेदवार पोलीस भरतीच्या मैदानात उतरले आहेत. यात इंजिनीअरिंग व फार्मसी या व्यावसायिक पदव्या घेतलेले तरुणही आहेत. शंभर उमेदवारांनी इंजिनीअरिंग, तर 13 जणांनी फार्मसीची पदवी संपादित केल्याची नोंद शहर पोलीस आयुक्तालयाने केली आहे.
नाशिक शहर पोलीस दलात शिपाई पदाच्या 118 रिक्त जागांसाठी होणारी मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. या भरतीमध्ये पाच हजार 590 पुरुष, दोन हजार 125 महिला व दोन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले आहेत. साडेचार हजार उमेदवार बारावी उत्तीर्ण, तर अडीच हजार उमेदवार पदवीधर आहेत. खासगी नोकऱ्या मिळत नसल्याने भरतीसाठी रांगा लागल्या
7 जुलैला लेखी परीक्षा
7 हजार 717 पैकी दोनशेपेक्षा जास्त उमेदवार मैदानी चाचणीत छाती व उंचीच्या निकषांमध्ये अपात्र ठरले. मैदानी चाचणीनंतर आलेल्या हरकतींची पडताळणी करून गुणवत्ता यादी व लेखी परीक्षेस पात्र असलेल्यांची यादी जाहीर होईल. 7 जुलै रोजी लेखी परीक्षा नियोजित आहे. त्यानंतर भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल व निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर होईल.
उच्चशिक्षित उमेदवार पोलीस भरतीत
- बारावी- 4,761
- पदवीधर- 2,411
- पदव्युत्तर- 545
- बीई इंजिनीअर- 100
- एलएलबी- 3
- बी. एड.- 3
- इंटेरियर डिझायनर- 1
- बी. एससी ऍग्री – 36
- बी. फार्मसी – 13
- हॉटेल मॅनेजमेंट – 4