हिंदुस्थानी युवती अंतिम फेरीत! गत उपविजेत्या इंग्लंडला धक्का देत सलग दुसऱ्यांदा जेतेपदासाठी झुंजणार

पारुनिका सिसोदियाने इंग्लंडच्या तीन फलंदाजांचे उडवलेले त्रिफळे आणि त्यानंतर जी. कमलीनीच्या तडाखेबंद 56 धावांच्या अभेद्य खेळीच्या जोरावर हिंदुस्थानी युवतींनी 19 वर्षांखालील युवतींच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 30 चेंडू आणि 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आणि सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता हिंदुस्थानी युवतींना जगज्जेतेपद राखण्यासाठी दक्षिण आफ्रिकन संघाशी भिडावे लागणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत हिंदुस्थानच्या युवतींनी नॉनस्टॉप सहाव्या विजयाची नोंद करत अंतिम फेरी गाठली.

युवतींच्या टी-20 क्रिकेटचा पहिला वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पार पडला होता. यात हिंदुस्थानने इंग्लंडला नमवत पहिल्यावहिल्या वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले होते. त्याच इंग्लंड संघाचा हिंदुस्थानी युवतींनी आज उपांत्य फेरीत ध्व्वा उडवला. गत स्पर्धेत यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ सुपर- सिक्समध्ये बाद झाला होता.

इंग्लंडचे 11 धावांत 6 फलंदाज गारद

इंग्लंडच्या संघाची सुरुवात समाधानकारक झाली होती. आधी पारूनिकाने तीन चेंडूंत दोन हादरे दिले आणि मग डेव्हिना पेरीन आणि कर्णधार अॅबी नॉरग्रूवच्या सोबत 44 धावांची भागी रचत संघाला सावरले. पण 2 बाद 81 अशा स्थितीत असलेल्या इंग्लंड युवतीच्या संघाला आयुषी शुक्लाने धक्का दिला. तिने पेरीनची (45) यष्टी वाकवून ही जोडी पह्डली आणि त्यानंतर त्यांचा संघ असा हादरला की, अवघ्या 11 धावांत धडाधड पाच विकेट पडल्या. वैष्णवी शर्माने आपल्या एकाच षटकातील चार चेंडूंत तीन विकेट टिपल्या. मग अमू सुरेनपुमार आणि टिली कोर्टिन-कोलमनने उर्वरित चार षटकांत 21 धावांची भागी करत संघाला शंभरी ओलांडून दिली.

सिसोदियाने इंग्लंडलाच उडवले

इंग्लंडच्या अॅबी नॉरग्रोव्हने टॉस जिंपून प्रथम फलंदाजी घेतली आणि डेव्हिना पेरीनने जेमिमा स्पेन्सच्या साथीने 37 धावांची दणदणीत सलामी दिली. पण ही जोडी पह्डली ती पारुनिका सिसोदियाने. तिने आपल्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर स्पेन्सचा त्रिफळा उडवला आणि हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. मग अवघ्या एका चेंडूनंतर तिने टडी जॉन्सनचाही त्रिफळा उडवून खळबळ माजवली. पारुनिकाने आपला तिसरा विकेटही पॅटी जोन्सचा त्रिफळा उद्ध्वस्त करत मिळवला होता. तिची हीच कामगिरी इंग्लंडला धोकादायक ठरली.

कमलीनीची कमाल

हिंदुस्थानच्या युवती जगज्जेतेपदाच्या लढतीत धडक मारण्याच्या ध्येयानेच मैदानाता उतरल्या. कमलीनीने गोंगडी त्रिशासोबत 9 षटकांत 60 धावांची सलामी देत आपला अंतिम फेरी प्रवेश निश्चित केला होता. त्रिशा बाद झाल्यावर कमलीनी आपल्या आपल्या बॅटची कमाल दाखवताना सानिका चाळकेबरोबर 57 धावांची अभेद्य भागी रचत संघाच्या विजयावर 15 व्या षटकातच शिक्कामोर्तब केले. कमलीनीने 50 चेंडूंत 8 चौकार खेचत नाबाद 57 धावा चोपल्या, तर सानिका 11 धावांवर नाबाद राहिली.

दक्षिण आफ्रिकाही अंतिम फेरीत

दुसऱ्या उपांत्य सामन्याप्रमाणे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामनाही टॉस हरणाऱ्या संघाने जिंकला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकताना 20 षटकांत 8 बाद 105 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात किवा ब्रेने 36 तर एला ब्रिसकोने नाबाद 27 धावा केल्या. आफ्रिकेच्या अॅशले वॅन वीकने  17 धावांत 4 विकेट टिपत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार लावले. तीच विजयाची मानकरी ठरली. आफ्रिकेने 106 धावांचे लक्ष्य 5 विकेटच्या मोबदल्यात सहजगत्या गाठले. जेमीमा बोथाने सर्वाधिक 37 धावा ठोकताना 2 षटकार आणि 5 चौकार ठोकले.