हिंदुस्थानने मलेशियाचा केला लाजिरवाणा पराभव, अवघ्या 17 चेंडूंतच विजय

19वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला संघाने अनोखा पराक्रम करताना यजमान मलेशियाचा अवघ्या 17 चेंडूंतच पराभव केला आणि महाविजयाची नोंद केली. मलेशियाचे 32 धावांचे माफक आव्हान हिंदुस्थानी महिलांनी 10 विकेट आणि 103 चेंडू राखून गाठले. वैष्णवी शर्माने 5 धावांत टिपलेल्या 5 विकेटच्या जोरावर हिंदुस्थानने या महाविजयावर शिक्कामोर्तब केले.

नाणेफेक जिंकून हिंदुस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 14.3 षटके खेळूनदेखील मलेशिया संघाला केवळ 31 धावाच करता आल्या. 13 व्या षटकापर्यंत मलेशियाची 7 बाद 30 अशी स्थिती होती. कर्णधार निकी प्रसादने 14 वे षटक वैष्णवीला सोपवले. या षटकात तिने हॅटट्रिक घेत मलेशियाचा संघ 31 धावांत गारद केला. वैष्णवीने 4 षटकांत अवघ्या 5 धावा देत 5 विकेट टिपले. या चार षटकांमध्ये 1 षटक निर्धाव टाकले. तसेच आयुषी शुक्लाने 3.3 षटकांत 8 धावा देत 3 फलंदाजांना माघारी धाडले होते. हिंदुस्थानच्या भेदक गोलंदाजीपुढे मलेशियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडय़ाची धावसंख्या गाठता आली नाही. मलेशियाने दिलेल्या 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला आलेल्या हिंदुस्थानच्या त्रिशा गोंगडीने 12 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या आणि हिंदुस्थानला अवघ्या 2.5 षटकांतच विजय मिळवून दिला.

वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव मोठय़ा थाटामाटात पार पडला. या वेळी रमाधामचे अध्यक्ष चंदुमामा वैद्य यांनी हिंदुस्थानचे जागतिक ख्यातीचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त रमाधामने प्रकाशित केलेले ‘इंडियन क्रिकेटर्स’ हे पुस्तक भेट दिले. या वेळी 2011च्या वर्ल्ड कपचे मीडिया मॅनेजर व टाटा रुग्णालयाचे माजी सीईओ डॉ. एस.एच. जाफरी, प्रसिद्ध योगातज्ञ श्रीनिवास डोंगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.