कौतुटुंबिक वादातून काकाने पुतण्याची हत्या केल्याची घटना वांद्रे येथे घडली. कामराज फैजल रहमान खान असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी हबीबुर रहमान खान आणि सना हबीबुर रहमान खानला वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार इम्रान खान हा वांद्रेच्या गॅलेक्सी चित्रपटगृह परिसरात राहतो. त्याचे तेथे किराणाचे दुकान आहे. तर कामराज हा रिक्षा चालवण्याचे काम करत होता. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ कारणावरून त्याच्यात वाद झाला होता. शनिवारी हबीबूर रहमान, सना खान यांनी तक्रारदार याची बहीण, कामराज आणि भाचा सादिकेन याच्यासोबत वाद घातला. वादानंतर हबीबूरने तेथे पडलेला लाकडी बांबू कामराजच्या डोक्यात मारला. तसेच सनानेदेखील सादिकेनच्या डोक्यात बांबू मारून जखमी केले. डोक्यात बांबू मारल्याने त्या दोघांना भाभा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून कामराजला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच वांद्रे पोलीस घटनास्थळी आले. कामराजच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच हबीबूर रहमान आणि सना खानला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. हबीबूरविरोधात एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. त्या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. त्याना पोलीस कोठडी सुनावली आहे.