
कल्याणधील काटेनमोली परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. येथील नाना पावशे चौकात काकानेच आपल्या पुतण्याची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गावच्या जमिनीवरून वाद झाल्याने काकाने पुतण्याची निघृणपणे हत्या केली. या घटनेनंतर कोळशेवाडी पोलिसांनी आरोपी काकावर गुन्हा दाखल केला. त्याला अवघ्या काही तासांमध्ये अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रंजीत दुबे असे मृत व्यक्तीचे नाव असून राम सागर असे आरोपी काकाचे नाव आहे. रंजीत दुबेच्या बहिणीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यामुळे घडलेल्या प्रकरणाचा उलगडा झाला. काही दिवसांपूर्वी गावच्या जमिनीवरून घरात वाद झाला होता. याच्याच सूडातून राम सागरने रंजीत दुबेला मारले. रामसागरने आधी रंजीतवर गोळी झाडली. ती गोळी थेट रंजीतच्या बरगड्यांजवळ लागली. त्यामुळे तो स्वत: जीव वाचवण्यासाठी जिवाच्या अकांताने पळत होता. यावेळी धावता धावता त्याला दम लागला आणि त्यामुळे तो खाली पडला. याचवेळी रामसागरने रंजीतच्या डोक्यात आठ वेळा चाकू खुपसला. यामध्ये रंजीतचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी माहिती रंजीत दुबेच्या बहिणीने दिली.
दरम्यान, पोलिसांना या हत्येती माहिती मिळताच त्य़ांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला काही वेळातच अटक केली आहे. तसेच सध्या पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.