
सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार बोलबाला असलेल्या ‘छावा’ चित्रपटाचे बेकायदेशीरपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारण केले जात आहे. सिनेमा डाऊनलोड करून तो प्रोजेक्टरच्या सहाय्याने छोटय़ा पडद्यावर दाखवला जातोय, शिवाय समाजमाध्यमांवरदेखील उपलब्ध केला जात असल्याने त्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात त्या तक्रारीवरून एक हजार 818 संकेतस्थळांविरोधात तब्बल 57 पानांचा एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
चित्रपटगृहामध्ये ‘छावा’ चित्रपट हाऊसफुल्ल चालला आहे. पण काही भामटे बेकायदेशीरपणे हा चित्रपट विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरून दाखवत आहेत. काहीजण सिनेमा डाऊनलोड करून तो पेनड्राईव्हच्या सहाय्याने गावखेडय़ात छोटय़ा पडद्यावर दाखवत आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर मोडक फिल्म प्रा.लि.ने पायरसीविरोधात काम करणाऱ्या ऑगस्ट एटरटेंन्मेंट प्रा. लि. या एजन्सीची नेमणूक केली होती.
या एजन्सीचे सीईओ रजत हकसर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात कॉपी राईट कायदा व सिनेमाला बाधा ठरणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कॉपी राईट, सिनेमॅटोग्राफ कायदा व माहिती-तंत्रज्ञान कायद्यांच्या विविध कलमांन्वये एक हजार 818 संकेतस्थळांविरोधात 57 पानी एफआयआर नोंदवला आहे.