
‘चल हल्ला बोल’ या सिनेमाला सेन्साॅर बोर्डाने सर्टिफिकेट नाकारल्यानंतर, सध्या सेन्साॅर बोर्डाविरोधात सर्वत्र टिकेची झोड उठत आहे. बहुजनांची संस्कृती आणि अभिव्यक्ती नाकारणारे सेन्सॉर बोर्ड बरखास्त करण्यात यावे असा एकमुखी ठराव सेन्सॉर बोर्ड विरोधी राज्यस्तरीय परिषदेत संमत करण्यात आला. लोकांचा सिनेमा चळवळ आणि विविध जनसंघटनांच्यावतीने मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना निरंजन टकले म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनेक मार्गाने हल्ले होत आहेत. ते रोखायचे असतील तर, आपणही नवनवे पर्याय वापरून ते रोखायला हवे. ही परिषद देशात वाढत असलेल्या सर्व तऱ्हेच्या सेन्सॉरशिप विरुद्ध आवाज उठवणारी परिषद असल्याचे रवि भिलाणे यांनी मांडले. आपण पहात असलेले सेन्सॉर हटावचे स्वप्न एक दिवस नक्की सत्यात उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय स्वातंत्र्यापासून आजतागायत ब्राम्हणी, भांडवली विचारधारेच्या जोपासने करिता कार्यरत असणाऱ्या तसेच बहुजनांची अभिव्यक्ती आणि संस्कृती नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचा ही परिषद निषेध करत आहे. तसेच आज देशात देव, धर्म, इतिहास आदी विषयांचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या तऱ्हेची अघोषित पण खुलेआम जाणवणारी सेन्सॉरशिप लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा कोणत्याही तऱ्हेच्या सेन्सॉरशिपला ही परिषद आपला जाहीर विरोध प्रदर्शित करत आहे. असे महत्त्वाचे ठराव या राज्यस्तरीय परिषदेमध्ये मांडण्यात आले होते.
‘चल हल्ला बोल’ सिनेमाचे लेखक दिग्दर्शक महेश बनसोडे परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. या परिषदेला ज्येष्ठ शोध पत्रकार निरंजन टकले, प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अविनाश दास, लोकांचे दोस्त रवि भिलाणे, कष्टकऱ्यांचे नेते विठ्ठल लाड, अभिनेत्री प्रतिभा सुमन शर्मा, पँथर सुमेध जाधव, डॉ.स्वप्नील ढसाळ, डॉ.संगीता ढसाळ आदींनी संबोधित केले. ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे यांनी ठरावाचे वाचन केले तर ज्योती बडेकर यांनी आभार प्रदर्शन केले. ‘चल हल्ला बोल’ या मराठी चित्रपटाचा विनामूल्य ट्रायल दाखविण्यात आला.
बंडखोर कवी व दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्यावर जीवनावर आधारीत चित्रपट ‘चल हल्ला बोल’ सध्या सेन्साॅर बोर्डाच्या कात्रीत सापडला आहे. ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट दलित पँथर तसेच युवा क्रांती दल यांच्यातील चळवळीवर बेतलेला चित्रपट आहे. “कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही”. या सेन्साॅर बोर्डातील अधिकाऱ्याच्या वक्तव्यामुळे सध्याच्या घडीला दलित चळवळीतील कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील जनतेकडूनही संताप व्यक्त होत आहे.