
डी. जी. रुपारेल महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उमेद 2025 – आशा जगण्याची हा महोत्सव 15 व 16 फेब्रुवारी रोजी पार पडला. बालपण ही उमेदची संकल्पना होती. ज्येष्ठ नागरिकांना बालपण पुन्हा जगण्याची संधी दिली गेली. दैनिक ‘सामना’ हे या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
रुपारेल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक हे ज्येष्ठ नागरिकांना स्वतःमधील कला, काwशल्य सादर करण्यासाठी रंगमंच मिळवून देतात. उमेद हा सामाजिक कार्यक्रम 2007 पासून आयोजित केला जातो. यंदा ‘उमेद’चे 17 वे वर्ष होते. या दोनदिवसीय महोत्सवात 200 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. या महोत्सवात मुख्यतः ‘गोड-तिखट आठवणी’, ‘सुरांची धमाल’, ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ आणि ‘उमेद किंग अॅण्ड क्वीन 2025’ अशा एकूण चार स्पर्धांचा समावेश होता. या वर्षीचे ‘उमेद किंग’ उदेश आंब्रे तर क्वीन श्रद्धा चंपानेरकर हे ठरले. लावणीसम्राट पवन तटकरे आणि नूपुर (डान्स ग्रुप) आणि स्वरसाधना (म्युझिक ग्रुप) त्याचबरोबर एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांनी आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. यावेळी महाविद्यालयाच्या ट्रस्टी अनिता हमंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप मस्के, उपप्राचार्या डॉ. वैशाली जावळेकर, उपप्राचार्य डॉ. क्रिष्णकांत वाघमोडे, एन.एस.एस. विभागाचे प्रोग्रॅम ऑफिसर एकनाथ लहामाटे हेसुद्धा उपस्थित होते.