नवे जिल्हे, तालुक्यांच्या निर्मितीसाठी दांगट समिती; विधान परिषदेत महसूलमंत्र्यांनी दिली माहिती

वाढत्या लोकसंख्येनुसार नवे जिल्हे आणि नव्या तालुक्यांची निर्मिती करण्याचा विचार सरकार करत असून यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीला अहवाल पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महसूलमंत्र्यांनी आज विधान परिषदेत दिली.

नंदुरबार जिह्यात अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यात मोलगी येथे नवीन तालुक्याची निर्मिती करा, अशी मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधान परिषदेत केली. मोलगी तालुक्याची घोषणा करून त्याच्या उद्घाटनाच्या तारखाही निश्चित केल्या, परंतु काही कारणास्तव त्यावर निर्णय झाला नाही. मोलगी तालुका झाल्यास आदिवासींसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे मोलगी हा लवकरात लवकर तालुका घोषित करावा, अशी मागणी लावून धरली.

वेगळ्या माणदेश जिह्याची निर्मिती करा!
आमदार महादेव जानकर यांनी पाडवींच्या मुद्दय़ाला पाठिंबा दिला. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची व्यथा मांडली. ते म्हणाले, सातारा, सांगली, सोलापूर मिळून माणदेश हा एक विशेष जिल्हा निर्माण करावा, जेणेकरून या भागाचा विकास योग्य रीतीने होईल, अशी मागणी त्यांनी केली. आमदार विक्रम काळे, श्रीकांत भारतीय, अंबादास दानवे, राजेश राठोड, गोपीचंद पडळकर यांनीही राज्यातील विविध भागांची माहिती देत नवे जिल्हे आणि तालुके करण्याची मागणी केली. यासंदर्भात धोरणात्मक निर्णय करण्यासाठी निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.