
विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. क्राइम ब्रँचच्या आवारात अशाच प्रकारे जवळपास 46 वाहने वर्षानुवर्षे धूळ खात पडली आहेत. त्यामुळे ही बेवारस वाहने लवकरात लवकर घेऊन जा, अन्यथा त्यांचा लिलाव करू असा दमच उल्हासनगर क्राइम बॅचच्या पोलिसांनी वाहनमालकांना दिला आहे. ही वाहने घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी वाहनमालकांना सात दिवसांची डेडलाईन दिली आहे.
चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोरी व अपघाताच्या घटनांचा उलगडा करून पोलिसांनी जप्त केलेली वाहने पोलीस ठाण्यात जमा करतात. मात्र ही वाहने वर्षानुवर्षे धूळ खात पडून असतात. उल्हासनगर क्राइम ब्रँचच्या कार्यालयाबाहेरदेखील अशाच प्रकारे 46 वाहने बेवारसपणे पडून आहेत. त्या वाहनांची झीज झाली असून अनेक वाहने गंजून त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर, इंजिन व चेसिस नंबर नष्ट झाला आहे. ही गंजलेली वाहने एकाच ठिकाणी पडून असल्याने त्या ठिकाणी अडगळ निर्माण झाली असल्याने त्या वाहनांची कायदेशीररीत्या विल्हेवाट लावणे अत्यंत आवश्यक असल्याने ज्या मालकांची ही वाहने आहेत त्यांनी वाहनांची कागदपत्रे व ओळख पटवून सात दिवसांच्या आत वाहने घेऊन जावे, अन्यथा त्यांचा लिलाव केला जाईल असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिला आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाची मदत
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन कुंभार, सतीश सपकाळे, प्रकाश पाटील, रितेश वंजारी यांनी कल्याण प्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने 46 वाहनांचा मूळ मालकांचा शोध घेतला. या शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना 11 मूळ मालकांचे नाव व पत्ते मिळून आले. त्यानुसार ही वाहने घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी मालकांसोबत पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान लिलावातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरली जाणार असल्याची माहिती कोळी यांनी दिली.