निराधार तसेच भीक मागणाऱ्या मुलींना आश्रय देण्यासाठी सरकारने उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाचमध्ये निरीक्षणगृह उभारले. तेथे त्यांची जेवण्याची तसेच राहण्याचीदेखील व्यवस्था केली आहे. पण याच निरीक्षणगृहातून खिडकीच्या जाळ्या तोडून सात मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने शोध घेत सातपैकी सहा जणींना मध्यरात्री शोधून काढण्यात यश मिळवले असून आणखी एका फरार मुलीचा शोध सुरू आहे. या सर्व मुली उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यातील आहेत. सुरक्षा व बंदोबस्त असूनही निरीक्षणगृहातून मुली पळाल्या कशा, याचीही चौकशी करण्यात येणार आहे
तहसीलदार कार्यालयाजवळ महाराष्ट्र शासनाचे मुलींचे निरीक्षणगृह आहे. घरातून पळून आलेल्या, भीक मागणाऱ्या व रेल्वे, बस स्थानक आदी ठिकाणी राहणाऱ्या अल्पवयीन मुलींना पकडून त्यांना येथे आणले जाते. तसेच शिक्षणासह विविध सोयीसुविधा देण्यात येतात. मात्र बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास निरीक्षणगृहातील सात मुलींनी खिडकीच्या जाळ्या तोडून त्यातून पळ काढला. मुली पळून गेल्याची माहिती सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी थेट हिललाईन पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली विशेष टीम तातडीने तयार करण्यात आली व त्यांनी पळालेल्या मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
नेमक्या त्यावेळी लोकल नसल्याने स्थानकावर 7 मुली गाडीची वाट पाहात होत्या. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन परत आणले आणि निरीक्षणगृहाच्या अधीक्षिका व्ही.व्ही.एन. सिल्व्हर यांच्या ताब्यात दिले.
पळून गेलेल्या एका मुलीचा अद्यापि ठावठिकाणा लागलेला नाही. मात्र तिलाही लवकरच शोधून आणू, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मुली रेल्वे स्टेशनवर जाण्याची शक्यता असल्याने डीसीपी सचिन गोरे, एसीपी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची टीम त्वरित उल्हासनगर, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर दाखल झाली.
सुरक्षारक्षक, केअरटेकरची हकालपट्टी
शासकीय निरीक्षण गृहातील 7 मुली पळून गेल्याचा ठपका ठेवून एक महिला सुरक्षारक्षक व केअरटेकरची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती अधिक्षिका व्हीव्हीएन सिल्व्हर यांनी दिली. या दोघीही दोन महिन्यांपूर्वी कंत्राटी पद्धतीने नोकरीला लागल्या होत्या. आता त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.