महिलांची चेंजिंग रूम बनली ‘भूतबंगला’, उल्हासनगर पालिकेत भितींना तडे… छताचे टवके उडाले

उल्हासनगर महापालिकेची इमारत धोकादायक जाहीर केली असतानाच महिला सुरक्षारक्षक-शिपाई यांच्यासाठी असलेली चेंजिंग रूम भूतबंगला बनली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भितींना तडे, छताचे टवके उडाल्याने प्लास्टर कधीही कोसळेल, अशी अवस्था झाली आहे. सुरक्षारक्षक महिलांना जीव धोक्यात घालून येथेच कपडे चेंज करावे लागतात. इतकी अवस्था बिकट असतानाही याविषयी वरिष्ठांशी बोलण्याचे धाडसही कोणी केले नाही.

मार्च 2025रोजी आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मान्यतेने महाराष्ट्र सुरक्षा बलचे 57 कर्मचारी महापालिकेत तैनात करण्यात आले. यामध्ये 8 महिलांचा समावेश आहे. या पालिकेच्या तळमजल्यावर असलेली चेंजिंग रूम त्यांना देण्यात आली. मात्र आत प्रवेश करताच तुटलेल्या खिडक्या, भिंतींना पडलेल्या भेगा, काळवंडलेला रंग हे चित्र निर्दशनास आले. त्यांनी तत्काळ याची तक्रार महाराष्ट्र सुरक्षा बलचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजेंद्र उबाळे यांच्याकडे केली. उबाळे यांनी महानगरपालिकेच्या मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे यांना या समस्येविषयी निवेदन दिले. त्यानंतर तुटलेल्या खिडक्यांची तातपुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली.

टाकीचे पाणी खिडकीतून थेट कक्षात
टाकी ओव्हरफ्लो होऊन सर्व पाणी रविवारी थेट महिला चेंजिंग रूममध्ये शिरले. त्यावेळी कक्षात महिलांचे बूट आणि रजिस्टर होते. पाणी शिरल्याचे समजताच सुरक्षारक्षकांनी सर्व साहित्य बाहेर काढले. सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितल्यावर त्यांनी खिडक्यांची डागडुजी केली आहे. तसेच खिडकीतून आलेल्या पाण्याविषयीची माहिती घेऊ, असे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे यांनी सांगितले.