
एका वृद्धाला तासन्तास तिकिटाच्या रांगेत उभे केल्याचा जाब विचारताच परप्रांतीय आरपीएफ जवानाने ‘मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा!’, अशी मुजोरी मराठी माणसासोबत केली. हा संतापजनक प्रकार उल्हासनगर रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरवर घडला आहे. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मराठी अधिकाऱ्यानेही हिंदीत बोलण्याचा अजब सल्ला दिला.
मराठा सेक्शनमध्ये राहणारे एक वृद्ध तिकीट काढण्यासाठी गेले असता त्यांना तासन्तास रांगेत उभे केले. याची माहिती मिळताच त्या वृद्धाच्या ओळखीच्या मराठी रहिवाशांनी तिथे धाव घेतली. त्यावेळी तिथे ऑन डय़ुटी असलेल्या एका आरपीएफ जवानाने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. त्यावरून ‘मराठीत बोला’ असे त्याला सुनावले, मात्र त्या मुजोर आरपीएफ जवानाने, ‘मला मराठी येत नाही,जा माझी तक्रार कुठेही करा’, असे सांगितले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला… कधी?
मुख्यमंत्र्यांनी चार दिवसांपूर्वीच सरकारी कार्यालयात मराठी भाषेतच बोलले पाहिजे असा जीआर काढला असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, असे सांगितले असता, ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला?’ असा उलट सवाल या मराठी आरपीएफ जवानाने केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून याप्रकरणी आरपीएफच्या वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.