
उल्हासनगर शहरात किती कचरा जमा होतो, घंटागाडी प्रत्येक प्रभागातील कचरा उचलते की नाही याची माहिती पालिकेला आता एका क्लिकवर समजणार आहे. यासाठी एक अॅप तयार करण्यात आला असून त्यावर पालिकेला सर्व माहिती कळणार आहे. दरम्यान साफसफाईवर क्यूआर कोडचा वॉच राहणार आहे. आतापर्यंत सवालाख घरे, बिल्डिंग आणि सोसायट्यांवर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन क्यूआर कोडची पडताळणी केली.
स्वच्छ सर्वेक्षण भारत अंतर्गत महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेरचा परिसर, चौक पाण्याने धुऊन चकाचक केले. त्यानंतर मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, निरीक्षक अंकुश सोनवणे, रवी भेनवाल, रवी टाक, राधा कुसाट, पूर्वजा पगारे यांनी कचरा यंत्रणेसाठी लावण्यात आलेल्या क्यूआर कोडची घरोघरी जाऊन पडताळणी केली. या क्यूआर कोडमध्ये घंटागाडी आली आहे की नाही, कर्मचाऱ्यांनी कचरा नेला आहे की नाही, नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा करून दिला आहे की नाही आदींची माहिती मिळणार आहे.
सहा ठिकाणी कंपोस्ट प्लॉट आतापर्यंत सवालाख क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. येत्या १५ दिवसांत उर्वरित ५० हजार क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. शहरात सहा ठिकाणी कंपोस्ट प्लॉट तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी शहरातील कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. ओला व सका कचरा वेगवेगळा करून न देणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी दिली.