
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात हिललाईन पोलिसांना यश मिळाले आहे. युवराज पवार, राहुल गायकवाड, वासुदेव फकिरा, कल्पेश बाविस्कर, अजय उर्फ कोयता पिल्ले अशी दरोडेखोरांची नावे आहेत.
या दरोडेखोरांपैकी काही आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. मात्र पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून पोलिसांनी पिस्तूल, मॅगझीन, जिवंत काडतुसे, मिरची पूड, वायर व रस्सी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
युवराज पवार आणि राहुल गायकवाड हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी २२ जुलै रोजी एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी नेताजी चौक परिसरातील दुकानदारांना पिस्तुलाचा धाक दाखवून दरमहा पाच हजार रुपयांची खंडणी मागितली होती. हे दोघेही हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केले.
दरम्यान, हे दोघेही आपल्या साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळताच विशेष पथकाने सापळा रचून नेवाळी नाका येथून अटक केली.
ज्वेलर्सचे दुकान फोडण्याची तयारी
युवराज आणि राहुल या दोघांनी आपल्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने सोमवारी रात्री नेवाळी नाका परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान फोडण्याची तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी पिस्तूलसह अन्य साहित्य गोळा केले.