
लाखो नागरिकांची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीचे पाणी सध्या ‘पिवळे’ झाले आहे. नदीत उगवलेली जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे. नदीला जलपर्णीचा विळखा पडल्याने संपूर्ण पात्र स्वच्छ करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. जलपर्णीच्या मुळाशी चिखल साचला असून पानगळ तसेच पालापाचोळ्यामुळे पाणी गढूळ होऊन ते पिवळसर बनले आहे. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
उल्हास नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी व अन्य वनस्पती वाढलेली आहे. ही जलपर्णी वनस्पती स्वयंचलित मशीनद्वारे काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जलपर्णीच्या मुळाशी असलेल्या गाळामुळे पाणी पिवळसर दिसत आहे. एमआयडीसीच्या शहाड येथील जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनची मात्रा योग्य ठेवून पाणी शुद्ध केले जात आहे. तरीदेखील पिवळसर पाण्याबाबत आपण आपल्या स्तरावर नागरिकांना अलर्ट करून पाणी उकळून व गाळून पिण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती शहाड विभागाचे उपअभियंता व्ही. व्ही. खतिले यांनी केली आहे.
आपटी, रायता, काम्बा, वरप, म्हारळ, सीमा रिसोर्ट, रिजेन्सी एण्टिलिया ते मोहना एनआरसी बंधाऱ्यापर्यंत ही जलपर्णी अवाढव्य स्वरूपात पसरलेली आहे. त्यामुळे मोहिली व मोहना बंधारा पाणी उपसा केंद्र येथे जलपर्णी अडकत आहे. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे आणखी काही दिवस तरी नळाला पिवळे पाणी येण्याची भीती व्यक्त होत आहे.
सामाजिक संघटनांनी केली होती आंदोलने
उल्हास नदीतील जलपर्णी ही वर्षानुवर्षांची डोकेदुखी या जलपर्णीमुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्याविरोधात मी कल्याणकर या संस्थेसह विविध सामाजिक संघटनांनी अनेकवेळा आंदोलने केली. नितीन निकम यांनी तर नदीच्या पाण्यामध्ये बसून आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर प्रशासनाला जाग आली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून दोन यंत्र उपलब्ध करून दिली आहेत. त्याद्वारे जलपर्णी मुळासकट काढण्याचे काम सुरू झाले आहे.