
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी युक्रेन रशियातले युद्ध थांबविल्याची टीमकी वाजवली होती. तर दुसरी कडे ज्या दिवशी मोदी रशियात पोहोचले त्याच दिवशी रशियाने युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर क्षेपणास्त्र डागलं. यात 41 जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला झाला त्याच दरम्यान मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतिन हे एकमेकांची गळाभेट घेत होते. त्यावरून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भडकले आहे. ”जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान हे जगातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराला मॉस्कोमध्ये मिठी मारत आहे. हे दृष्य निराशजनक आहे’ असे झेलेन्स्की यांनी ट्विट केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधानांना त्यांच्या निवासस्थानी रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले, जिथे दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. दरम्यान ही भेट होत असताना रशियाचे सैनिक युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला करत होते, आणि यात 41 लोकांचा बळी गेला, असे CNNने म्हटले आहे. यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
‘नरेंद्र मोदी आणि व्लादिमिर पुतिन यांनी गळाभेट घेतली. यांची ही भेट अतिशय निराशजनक आहे आणि या भेटीमुळे शांतता प्रक्रियेला मोठा तडा गेलेला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान हे जगातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराला मॉस्कोमध्ये मिठी मारत आहे. हे दृष्य निराशजनक आहे.’ असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष लोदिमिर झेलेन्स्की या्ंनी म्हंटले आहे.
युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात41 जण ठार
रशियाने युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर हवाई हल्ला केला. ज्यामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला असून 170 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.मृतांमध्ये कर्करोग रुग्ण व लहान मुलांचा देखील समावेश आहे. सोमवारी कीवमध्ये हा हल्ला झाला. यानंतर 600 हून अधिक रुग्णांना रुग्णालयातून दुसरीकडे हलवण्यात आले.