
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाळासाहेब कोल्हेंची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 75 दिवस उलटले, पण अजूनही कृष्णा आंधळे सापडत नाही. आरोपींना मदत करणारे उजळमाथ्याने फिरत आहेत. पोलिसांवर पुरावे नष्ट करण्यासाठी प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार, असा सवाल करत संपूर्ण मस्साजोग गावाने अन्नत्याग आंदोलन सुरू केले. गावातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही. मागण्या मान्य न झाल्यास पाणीही वर्ज्य करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.