मंगळवारी झालेली यूजीसी नेट परीक्षा रद्द, 9 लाख परीक्षार्थी लटकले

नीट परीक्षा निकालांमुळे निर्माण झालेला गोंधळ मिटला नसतानाच काल मंगळवारी झालेली यूजीसी नेट परीक्षाच काहीतरी ‘गडबड’ झाल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेला काल नऊ लाख परीक्षार्थी बसले होते.

नीट परीक्षेची आयोजक असलेल्या राष्ट्रीय चाचणी संस्थेकडूनच विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिपसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. कालच्या मंगळवारी नऊ लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. आता ही परीक्षा रद्द केल्यामुळे लाखो उमेदवारांच्या नियुक्त्या आणि फेलोशिप अनिश्चित काळासाठी रखडणार आहेत.

मंगळवारी झालेल्या या परीक्षेत काही गडबड झाली असण्याची शक्यता सूचित करणारी माहिती गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट अॅनालिटिक्स युनिटकडून मिळाल्यावर ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.