UGC Exam आज यूजीसी नेट परीक्षा, केंद्रावर स्वत:चे पेन घेऊन जाण्यासही बंदी

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने (यूजीसी) घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) उद्या 18 जून रोजी सकाळी 9.30 आणि दुपारी 2.30 अशा दोन सत्रांत घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) या परीक्षेचे आयोजन केले असून परीक्षेसाठी काही नियमावली जाहीर केली आहे. यंदा यूजीसी नेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पेपर-पेन प्रकारात होणार असून परीक्षेसाठी स्वतःचे पेन वापरण्यास परीक्षार्थ्यांना बंदी घालण्यात आली आहे. एनटीएकडून परीक्षार्थ्यांना पेन दिले जाणार आहे. तसेच परीक्षेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर प्रवेश बंद करण्यात येणार आहे. परीक्षार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या दीड तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे.

परीक्षार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि स्वतःचा फोटो घेऊन जाण्यास परवानगी आहे. परीक्षार्थ्यांची पूर्ण तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. पीएचडी प्रवेशासाठी आता यूजीसी नेट परीक्षा घेण्यात येत असून या परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे विद्यापीठात प्रवेश दिला जाणार आहे. जून 2024 पासून याआधारे प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. नेट परीक्षार्थ्यांचा निकाल तीन प्रकारांत जाहीर केला जाईल. प्रथम ज्युनियर रिसर्च फेलोशिपसह पीएचडी प्रवेश आणि असिस्टंट प्रोफेसर पदावरील नियुक्ती, दुसरे ज्युनियर रिसर्च फेलोशिपशिवाय पीएचडी प्रवेश आणि असिस्टंट प्रोफेसर पदावरील नियुक्ती तसेच तिसऱ्या प्रकारात केवळ पीएचडीसाठी प्रवेश दिले जाणार आहेत. परीक्षेच्या निकालात पर्सेंटाईलसह गुण देण्यात येतील. या गुणांचा वापर पीएचडी प्रवेशासाठी होणार आहे.

परीक्षा केंद्रावर या वस्तू नेण्यास परवानगी

पारदर्शक पाण्याची बाटली

पासपोर्ट आकाराचा फोटो असलेले प्रवेशपत्र

हजेरीपत्रात लावण्यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो

पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधारकार्डची मूळ प्रत

पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट

परीक्षा केंद्रावर या वस्तू नेण्यास मज्जाव

हस्तलिखित मजकूर, पेपर, पेन्सिल बॉक्स, प्लॅस्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, पेन, पट्टी, रायटिंग पॅड, पेन ड्राईव्ह, खोडरबर, लॉग टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन, मोबाईल फोन, कॅमेरा, ब्लूटूथ, इअरपह्न, मायक्रोपह्न, हेल्थ बॅड, पर्स, गॉगल, हेअरपिन, बेल्ट, टोपी, एटीएम कार्ड, सोन्याचे दागिने, खाद्यपदार्थ.