शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या रविवारी पैठण येथे धडाडणार आहे. संत एकनाथ साखर कारखान्याच्या मैदानावर दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसंवाद मेळावा होणार आहे. यानिमित्ताने होणाऱ्या जाहीर सभेत कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ हे आपल्या संचालक मंडळासह शिवबंधन बांधणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर पैठण विधानसभा मतदारसंघात जागोजागी भव्य कमानी, भगवे ध्वज, पताका, झेंडे व डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्राचा वाघ येतोय… गद्दारांचा हिशेब करायला!’ अशा आशयाचे फलक लक्ष वेधून घेत आहेत. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते डॉ. अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर हे उपस्थित राहणार आहेत. संत एकनाथ साखर कारखान्याच्या मैदानावर ‘वॉटरप्रूफ’ मंडप उभारण्यात आला आहे. दुपारी 2 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्यानंतर दुपारी 3 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि ‘शेतकरी सभासद मंगल कार्यालय’चे लोकार्पण केले जाणार आहे. याच मेळाव्यात कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ हे आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
वैजापुरातही शिवसंवाद मेळावा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वैजापूर येथेही रविवारी शिवसंवाद मेळावा होणार आहे. जिल्हा परिषद शाळेच्या भव्य मैदानावर दुपारी 1 वाजता हा मेळावा होणार आहे.