
‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी उद्या संपूर्ण फोर्ट परिसर दुमदुमणार आहे. निमित्त आहे ते हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने आयोजित केलेल्या भव्यदिव्य शिवराय संचलनाचे. उद्या, शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता भारतीय रिझर्व्ह बँक, फोर्ट ते हिंदुस्थानचे प्रवेशद्वार यादरम्यान शिवराय संचलन पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या वेळी प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
शिवराय संचलनाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व समित्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आस्थापनामधील कर्मचारी बंधू व भगिनी तसेच शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत. सर्व आस्थापनांतील लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते संचलन मार्ग परिसरात भगवेमय वातावरण करणार आहेत. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष माजी आमदार विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, सरचिटणीस प्रदीप मयेकर तसेच शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विभागप्रमुख, महिला विभाग संघटक हे आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार आहेत. फोर्ट परिसरामध्ये मराठी माणसांचा ठसा उमटविणाऱया भव्यदिव्य शिवराय संचलनात सर्व शिवप्रेमींनी मोठय़ा संख्येने सामील व्हावे, असे आवाहन खासदार अनिल देसाई यांनी केले आहे.
संपूर्ण परिसर होणार भगवामय
या संचलनाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा फुलांनी आकर्षक सजावट केलेल्या ट्रकमध्ये स्थापन करण्यात येणार असून संचलनाच्या मार्गावर भगवे झेंडे, पताका, बॅनर लावून वातावरण भगवेमय करण्यात येणार आहे. यासाठी शिवसेना दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांचे सहकार्य लाभले आहे. शिवराय संचलनात भगव्या टोप्या, गमजे घालून कार्यकर्ते सामील होतील व भगव्या नऊवारी साड्या प्रधान करून महिला मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत.
शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके रंगणार
दुपारी 4 वाजता भारतीय रिझर्व बँक अमर बिल्डिंग फोर्ट येथून ढोलताशाच्या गजरात व तुतारी वादनाने प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत शिवराय संचलनाला सुरुवात होईल. फुलांनी सुशोभित केलेल्या वाहनात सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल तसेच फुलांनी सजवलेली शिवपालखी वाहून येणारे मावळे असतील. पालखीसोबत वारकरी भजन पथक असेल. विशेष आकर्षण म्हणजे दानपट्टा, ढाल-तलवार, लाटीकाटी, बाराबनाटी, चौरंग चक्र यांसारख्या शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली जातील. याशिवाय ढोलताशा पथक, नाशिक बाजा, लेझिम पथक असणार आहे. संचलनाच्या मार्गावर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जाईल.
असा असणार मार्ग
संचलनाच्या मार्गावरील हुतात्मा स्मारकास मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल. तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) येथील वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. शिवराय संचलनाचा समारोप हिंदुस्थानचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर शिवराय संचलनाचा समारोप होईल.
स्थळ – रिझर्व्ह बँक, फोर्ट ते हिंदुस्थानचे प्रवेशद्वार
वेळ – सायंकाळी 4 वाजता