
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनाजीपंतांकडून प्रेरणा घेऊन एक अनाजीसेना आली आहे, कारण अनाजीपंतच स्वराज्य आणि भगव्याशी द्रोह करू शकतात. म्हणून गद्दारांच्या सेनेचे नाव आजपासून अनाजीसेना, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गद्दारांवर जोरदार लत्ताप्रहार केला.
शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या भव्य शिवराय संचलनाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेना आणि स्थानीय लोकाधिकार संघाची महती सांगतानाच भैयाजी जोशी आणि मिंधे गटावर हल्ला चढवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन 1966 मध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. जशी शिवप्रेरणेतून शिवसेनेची स्थापना झाली तसाच स्थानीय लोकाधिकार समिती महासंघही एका निष्ठेची परंपरा जवळपास 49 वर्षे म्हणजेच जवळपास तीन पिढ्या कायम ठेवून पुढे वाटचाल करतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही महाराष्ट्राची दैवते आहेत आणि आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे शिवसैनिक आहोत. प्रत्येक काळातले आणि युगातले एक युद्ध असते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येणे अशक्य आहे, पण दुर्दैवाने अनाजीपंत आणि औरंगजेब जन्माला येत असतात. तसेच याही काळात ते आले आहेत.
अनाजीपंतांच्या कितीही पिढ्या आल्या तरी मराठी भाषा संपवणे शक्य नाही
आणखी एका अनाजीपंतांनी दोन दिवसांपूर्वी मराठी भाषेबद्दल गरळ ओकली होती, पण लक्षात ठेवा. शिवसेनेचे मावळे आहेत तोपर्यंत अनाजीपंतांच्या कितीही पिढ्या आल्या तरी त्यांना महाराष्ट्राचे संस्कार, शिवरायांची परंपरा, वारसा, मराठी भाषा संपवणे शक्य होणार नाही, असा इशारा देत उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशींवर तोफ डागली. मराठीबद्दल गरळ ओकणाऱया या अनाजीपंतांचा आज महाराष्ट्रातील तालुक्यातालुक्यांत शिवसैनिक व शिवप्रेमींनी निषेध नोंदवला, असेही ते म्हणाले.