उद्धव ठाकरे यांनी केली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या बांधकामाची पाहणी, जनतेला केले आवाहन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील स्मारकाची पाहणी केली. या पाहणीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला एक आवाहन केले आहे. ‘ज्यांच्या कुणाकडे बाळासाहेबांचे जुने फोटो, लेख, बातम्या, आठवणी असतील त्यांनी त्या शिवसेना भवन येथे आणून द्याव्या”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

”गेल्या तीन चार महिन्यात निवडणूकीमुळे मला व आदित्यला इथे यायला मिळाले नव्हते. निवडणूकीनंतर आज पहिल्यांदा आम्ही इथे आलो आहोत. आमच्या अनुपस्थितीतही काम व्यवस्थित झाले आहे. त्यासाठी मी आबाजी, टाटा व सुभाष देसाई यांना धन्यवाद देतो. जवळपास बांधकाम पूर्ण झालं आहे. जुलै अखेरपर्यंत बांधकाम पूर्ण होईल पण त्यानंतर खरं काम सुरू होईल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती आपल्याला इथे द्यायचीय. त्यांचं पूर्ण आय़ुष्य आपल्याला इथे साकारायचे आहे. त्या सगळ्याला सुरुवात होईल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ऑगस्टपासून स्मारकाचं इंटिरिअरचं काम सुरू होईल. 23 जानेवारीपर्यंत लोकार्पण करायचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा मी जनतेला आवाहन करतो की आपल्याकडे काही त्यांचे फोटो, लेख, भाषणं आठवणी असतील तर शिवसेना भवन इथे आणून द्यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.