महाराष्ट्राच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे; बिहारमध्ये मात्र बाटेंगें तो जितेंगे! उद्धव ठाकरेंची भाजपला सणसणीत चपराक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील भव्य निर्धार शिबिरात भाजपच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा टराटरा फाडला. “महाराष्ट्रातल्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि बिहारच्या निवडणुकी बांटेंगे और जितेंगे. म्हणजे भेटी वाटणार आणि मतं जिंकणार”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणीत चपराक लगावली. “आमचं हिंदुत्व हे इकतं तकलादू नाही. भाजप हा हिंदुत्त्ववादी हेच फेक नरेटीव्ह आहे”, असा आसूड उद्धव ठाकरे यांनी ओढला.

उपस्थित सर्व लढवय्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. शिवसेनाप्रमुखांचं मनोगत तुम्ही ऐकलं. मी भाग्यवान आहे मला माँ आणि बाळासाहेबांसारखे आई-वडील लाभले. आणि त्यांनी माझ्या पाठीशी तुमच्यासारखी जी पुण्याई उभी करून ठेवली आहे याचं सारखं भाग्य हे सत्तेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. कारण सत्ता असली की सगळे तिकडे जातात. ही तर जगरहाटी आहे. पण सत्ता नसताना जे राहतात तो खरा निष्ठावान आणि ते खरे आपले सोबती असतात. सत्यनारायणाची पूजा असली की तिर्थप्रसादाला सगळे जातात. तसे सगळे जाताहेत जाऊ द्या. मात्र, तुमच्यासारखे खरोखर ज्यांना आपण वाघाचे छावे म्हणून असे मर्द शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार माझ्यासोबत आहेत त्याचा मला अभिमान आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरला.

उन्हाळा तर तापला आहे. खूप गरम झाला आहे महाराष्ट्र, रेकॉर्ड ब्रेक. शिवसेनाप्रमुखांचं एक वाक्य आठवतंय, ज्यावेळा उन्हात सभा व्हायच्या. उन्हातील मोर्चात किंवा सभेत शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, जमीन तापलीय… वरनं सूर्य आग ओकतोय… पण मधली तुमची डोकी नुसती उन्हाने नाहीत तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तापलीत की नाही? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विचारांनी किती तुम्ही तापलाहेत हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती उद्या आपलं भविष्य आणि आपल्या महाराष्ट्राची नेमकी दिशा हे ठरवणार आहे. ही दिशा आपण ठरवणार, हे गद्दार नाही ठरवू शकत, असा आसूड उद्धव ठाकरे यांनी ओढला.

आणीबाणी नको, म्हणून ज्यांनी आणीबाणी लादली त्या इंदिराजींना संपूर्ण देशाने शिक्षा दिली. पण नंतर जनता पक्षाने देशाचे धिंडवडे, वाट लावली, मग त्याच देशाने त्याच जनतेने पुन्हा इंदिराजींना पंतप्रधानपदी बसवलं. याचं कारण संधी दिली होती, पण संधीचं सगळा चिखल करून टाकला, माती केली. आणि त्या सगळ्या घडामोडीतनं आज जे आपल्याला हिंदुत्व शिकवताहेत ते बाहेर पडले. बोगस जनता पार्टी… भारतीय जनता पार्टी म्हणून. एकूण त्यांची वाटचाल पाहिली तर खूप खोलामध्ये जाता येईल. मोदी म्हणाले, काँग्रेसने मुसलमान अध्यक्ष बनवून दाखवावा. काँग्रेस आणि तुम्ही बघा. पण मला एकदोन गोष्टी आवडल्या. त्यांचे आताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ ते म्हणाले, असं जर का असेल तर संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा, लावा शर्यत. या वर्षात संघाला शंभर वर्षे होताहेत, काँग्रेसला किती वर्षे झाली सव्वाशे-दीडशे. मग साधा एक हिशेब मांडूया संघाचे आतापर्यंतचे सरसंघचालक त्याच्यामध्ये कोण दलित होतं, कोण मुसलमान होतं? आणि काँग्रेसचे काढा आणि ठेवा लोकांसमोर. पण लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. अमित शहाजी छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्रापुरतं सीमीत ठेवणार नाही. महाराज तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत. पण खरोखर तुम्हाला जर त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच सभागृहात पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. इकडे येऊन नुसतं मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू नका, असा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फटकारले.

खचून जाणारा कधी लढू शकत नाही. लढायचं असेल, पाण्यात उडी मारायची असेल पैलतीर गाठायचं असेल तर नाकातोंडात पाणी जाईल. पण हिंमत असेल तर उडी मार नाहीतर तसाच परत जा. शिवसेनेचं तुम्ही या काळात सुद्धा काम करता. हार जीत हा एक विषय झाला. आपण मुळामध्ये काम कशासाठी करतोय, हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. शिवसेनाप्रमुखांच्या वक्तव्यामध्ये बबनरावांचा उल्लेख होता तसे सगळे जुने कार्यकर्ते आहेत. चंद्रकांत खैरे सुद्धा. काल परवा बातमी आली खैरेसाहेब नाराज, चाललेत. जा कुठे जाताहेत. जाऊ शकत नाही ही माणसं, जाऊच शकत नाही. कारण एक कुठलंतरी वाक्य घ्यायचं आणि पराचा कावळा करून टाकायचा. मात्र, हे सगळे माझ्यासोबत आहेत. आणि माझ्या सोबतच राहणार आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

माझ्याकडे भारतीय जनता पार्टी बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे. आपले सुद्धा लोक असतात इकडे तिकडे. असं काही नाही की त्यांचेच लोक आपल्याकडे असतात. त्यांच्यात पण काय चाललं हे मला रोज कळत असतं. त्यांनी मांडणी कशी केलीय हे मुद्दाम सांगतो. हे मुंबईचं आहे. यात जबाबदारी- त्यात नंबर एक आहे बूथ अध्यक्ष… त्याच्या पुढे माणसाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर. मग बूथ सरचिटणीस नाव पूर्ण नाव मोबाईल नंबर. मग सदस्य, लाभार्थी प्रमुख. त्यांचही नाव आणि मोबाई नंबर. मग सदस्य दोन.. सदस्य तीन… असं करत दहा सदस्यांची नावं आणि मोबाईल नंबर दिला आहे. ही तयारी आपण केली पाहिजे. त्यात 12 सदस्यांमध्ये किमान तीन महिला प्रतिनिधी असाव्यात. किमान १ एससी आणि एसटी प्रतिनिधी असावा. ही त्यांची मांडणी आहे. ईव्हीएमचा घोटाळा आहे. योजनांचं गारूड आहे. पण त्याच बरोबरीने बूथ मेनेजमेंट हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण ट्रेनिंग दिल तर आपलेही तयार होतील. बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो मतदार यादीतल्या प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्यासकट ओळखणारा पाहिजे. आणि त्या टीममधला जर का आपला पोलिंग एजंट असेल तर मतदानाला आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला त्याचं नाव आणि चेहरा जुळतोय हे ओळखणारा पाहिजे. कार्ड बोगस मिळू शकतं, चेहरा अजून बोगस मिळत नाहीये. एवढ्या पातळीपर्यंत ती लोकं गेलेली आहेत. आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल. आणि पुढे काय करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना केली.

“शिवसेनेने रक्तदानाचा विश्वविक्रम केलाय, भाजपने काय केलं?”

निवडणुकीनंतर एका काँग्रेसवाल्याने सांगितलं. ते घरी आले होते. काय झालं आपल्या विधानसभेला, आपल्या तीन पक्षांमध्ये जी काही खेचाखेची सुरू होती त्यामुळे लोकंपण संभ्रमात होती. आणि या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या सरकारने केलेलं काम हे आपणच मारून टाकलं. आपण आपल्या कामाबद्दल किती बोललो. आपण सरकार यशस्वीपणे चालवून दाखवलं होतं. अडीच वर्षे पूर्ण जगात करोनासारखं संकट असताना तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने आपण महाराष्ट्र सांभाळून दाखवला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. कर्जमुक्ती ही मी करून दाखवली होती. दहा रुपयात शिवभोजन हे देऊन दाखवलं होतं. मुंबईतील 500 फुटांपर्यंतची मालमत्तेचा कर रद्द करून दाखवला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी रद्द करून दाखवली होती. अनेक गोष्टी आपल्या सरकारने करून दाखवल्या होत्या. आपण चढाओढीत राहिले, पण आपण केलेलं काम म्हणजे या लोकांनी जे जनतेला भ्रमिष्ट केलं होतं तो भ्रम आपण पुसून टाकू शकलो नाही. आपण जे-जे काही केलं आहे ते फक्त नाशिक शहर नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी… हे आपण सांगितलं नाही तर मग काम करतोय कशासाठी? त्यामुळे हेही महत्त्वाचं आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जाऊ तिथे शिवसेनेनं काय-काय केलेलं आहे. शिवसेनेने एक विश्वविक्रम केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने सांगावं त्यांनी काय विक्रम केला आहे? शिवसेनेने रक्तदानाचा विश्वविक्रम केलेला आहे. भाजपचा विश्वविक्रम गोमुत्र वाटपाचा. हे असलं थोतांड आपल्याला करायची काही गरज नाही, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

“भाजप हा हिंदुत्त्ववादी हेच फेक नरेटीव्ह”

विशेषतः त्यांनी जो अपप्रचार केला. फेक नरेटिव्ह… फेक नरेटिव्ह की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. अरे मुस्लिम समाज आमच्यासोबत आला, का आला? कारण कोरोनामध्ये मी कधी जातीय भेदभाव केला नाही. मुख्यमंत्रीपदाच्या इभ्रतीला डाग लागू दिला नव्हता सगळ्यांना समानतेनं वागवलं होतं. आज जे काही भारतीय जनता पक्ष करतंय की, तुम्ही सांगा हिंदुत्व सोडलं की मी सोडलं? आपण वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध केला. कारण वक्फ बोर्ड विधेयकाचा आणि हिंदुंचा काडीचाही संबंध नाही. आणि एक कार्यक्रम करा, ठरावाच्या वेळेला संपूर्ण दोन दिवसांतली संसदेतली अमित शहांपासूनची सर्वांची भाषणं फक्त सगळ्यांना ऐकवा. अमित शहा, राजनाथ सिंह, किरेन रिजिजू, पियुष गोयल होते. त्यांच्यासमोर नितीशकुमार यांचे लल्लन सिंह, आणि तेलुगु देसमचे नेते सांगत होते, आम्ही मुसलमानांच्या हिताचं रक्षण जेडीयू आणि टीडीपी करेल. आणि हे नेभळटासारखे लाचारीने खाली मान घालून हसत होते. कारण तुमची सत्ता टिकवण्यासाठी जो काही सत्ता जिहाद केला कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला तुम्ही दूर केलंत. आणि मशिदीत जाणाऱ्या चंद्राबाबूंना तुम्ही सोबत घेतलं. आणि आम्हाला सांगता आम्ही हिंदुत्व सोडलं? तुमचं हिंदुत्व आहे तरी काय? कारण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हिंदू-मुस्लिम म्हणून नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. जो या देशासाठी मरायला तयार आहे, जो या देशाला मातृभूमी मानतो, माझा देश मानतो. तो जातीपाती धर्माने कोणीही असला तरी आमचा आहे ही शिकवण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिली आहे. हे काय करताहेत. शिवसेनेचा कार्यक्रम होऊ नये म्हणून काल रात्री तुम्हाला मुहूर्त मिळाला. हिंदु-मुसलमानांना लढवायचं म्हणजे हिंदुंना पेटवायचं मार मुसलमानांना दगड, मुसलमानांना पेटवायचं मार हिंदुंवरती दगड. दोन्ही दगडावरती पाय ठेवून तुम्ही सत्ता भोगायची. गरीब हिंदू आणि मुस्लिम मरताहेत. आजही मी सांगतो की, आम्ही राष्ट्रभिमानी आहोत. जे शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिवकवलं की प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात ठेवावा आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर देश हाच माझा धर्म असला पाहिजे. पण त्या वेळेला कोणी जर का धर्माची मस्ती करून माझ्यासमोर उभा राहिला तर त्याच्यासमोर कडवट राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून मी समोर उभा राहायला मागेपुढे पाहणार नाही. ही शिकवण आहे, असे म्हणताच शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

भारतीय जनता पक्ष ज्यांनी हनुमान जयंती झाली तेव्हा किती हिंदूंच्या घराघरा भेटी दिल्या त्यांनी? एकातरी हिंदूच्या घरात आले? यावेळेला प्रथम देशातल्या 32 लाख मुस्लिम कुटुंबियांना सौगात-ए-मोदी आणि भाजपने जो पैसा ओरबाडला त्या पैशातून मुस्लिमांच्या घरांमध्ये सौगात वाटताहेत. हिंदूंना दिली घंटा, यांना देताहेत सौगात आनंद आहे. पण हे कधी? तर मुस्लिमांसाठी आम्ही केलेल्या कामामुळे माझ्यासोबत आलेत म्हणून तुम्हाला आता हे सगळं सुचतंय. त्याच्या आधी काय करत होता, बटेंगे तो कटेंगे. महाराष्ट्रातल्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि बिहारच्या निवडणुकीत बाटेंगे और जितेंगे. भेटी वाटणार आणि मतं जिंकणार. यापासून हिंदू, मुस्लिम सर्व धर्मियांनी सावध व्हायला पाहिजे. कारण हे कोणाचेच नाही. वापरा आणि फेका, असे म्हणत उद्धव ठाकरे भाजपच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा टराटरा फाडला.

भगवा ही आमची ओळख आहे. आणि आम्ही हिंदू कसे आहोत? महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत आणि देशामध्ये आम्ही हिंदू आहोत. हे माझं वाक्य नाही शिवसेनाप्रमुखांचं वाक्य आहे. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे, हिंदुत्व जपणारा आपला महाराष्ट्र धर्म आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“पीडीपी, जेडीयू, अन्नाद्रमुक सगळे हिंदुत्व विरोधी पक्ष, त्यांच्यासोबत हे सत्तेत”

मी हिंदुत्व कुठे सोडलं ते मला दाखवा? कारण फेक नरेटिव्हचा जर विचार केला तर मुळामध्ये भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे हेच मोठं फेक नरेटिव्ह आहे. कारण तिकडे नितीशकुमार बरोबर युती केलेली आहे. हे नितीशकुमार संघमुक्त भारत पाहिजे असं बोलले होते. आंध्रमध्ये चंद्राबाबू बरोबर त्यांनी युती केली आहे. हे चंद्राबाबू मोदींना अतिरेकी बोलले होते. आणि मोदी चंद्राबाबूंना युटर्नबाबू बोलले होते. तिकडे काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तीसोबत बसले होते. मग एक गोष्ट तुम्ही दाखवा जी त्यांनी केलेली आहे आणि जी मी केलेली आहे, अशी एक गोष्ट दाखवा ना? कोणत्या तोंडाने तुम्हा आम्हाला सांगता हिंदुत्व. मुळामध्ये तुमचं जे हिंदुत्व आहे ते बुरसटलेलं आहे. आम्हाला ते मान्य नाहीच. तुम्हाला आम्ही सोडलेलं आहे आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

लढण्यासाठी जशी तलवार लागते. तलवार पकडायला मनगट लागतं. तसं लढण्यासाठी मन असावं लागतं तसं मन तुमच्याकडे आहे की नाही ते पाहिले मला सांगा? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी करताच शिवसैनिकांना मोठ्या आवाज हो म्हणत प्रतिसाद दिला. हा पराभव मी पराभव मानायला तयार नाही. हा आपला पराभव खोटा दाखवला गेला आहे. आज जरी बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली तरी आपलं सरकार पुन्हा यांच्यापेक्षा जास्त संख्येने आणि मतांनी आपली जनता… कारण माझ्या मायबाप जनतेवरती माझा पूर्ण विश्वास आहे. आपण मोठे केलेले हे गद्दार उफराटे निघाले तरी माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आपले महाराष्ट्रातले बांधव असे उलट्या काळजाचे होऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.