भगव्याला लागलेला गद्दारीचा डाग धुवून टाका! – उद्धव ठाकरे

कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. इथे भगव्याला गद्दारीचा डाग लावला, तो डाग धुवून टाका आणि मशालीच्या रुपाने भगव्याचे तेज प्रज्ज्वलित करा. कल्याण-डोंबिवली पुन्हा शिवसेनामय करून दाखवा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती, शिंदेगट युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, सचिव वरुण सरदेसाई, उपनेते कल्याण संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, माजी आमदार सुभाष भोईर तसेच कल्याण डोंबिवलीमधील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

मी बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली या सगळ्या भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांच्या पालख्या वाहिल्या. तुमच्याही डोळ्यावर झापड बांधली गेली होती आणि आता सगळ्यांचे डोळे उघडले हे चांगले झाले. तुम्ही ज्याच्या आहारी गेला होतात ते हिंदुत्व, ती शिवसेना आणि ते विचार बाळासाहेबांचे नाही हे तुमच्याही लक्षात आले, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही. तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे नेतोय. आम्ही जगू ते स्वाभिमानाने, लाचारी पत्करून नाही. हिंदुहृदयसम्राट आपल्याला सांगत आले की एकच दिवस जगायचे असेल तर वाघासारखे जगा शेळीसारखे नाही. आज अशा अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करत आहेत, अशा शब्दांनी उद्धव ठाकरे यांनी मिंधेना झोडपले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

तुम्ही परत आला याचा आनंद आहे. थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, जुलूमशाही लोकसभेतच गाडून टाकली असती. एका बाजुला प्रचंड ताकद, सत्ता, पैसा, झुंडशाही या सगळ्या गोष्टी असतानाही शिवसेनाप्रेमी मतदारांनी आपल्या सामान्य कार्यकर्तीला 4 लाख मतं दिली. शिवसेनेच्या साध्या कार्यकर्तीला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना यायला लागले. तरी देखील कल्याण-डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं भगव्याला दिली. त्या मतदारांचा अभिमान आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

गद्दारांनी सत्तेच्या लोभापायी आपले चांगले चालणारे सरकार पाडले. शिवसेना संपवायला निघाले, त्यांना कदापि परत घेणार नाही. मात्र तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते दिशाभूल झाली म्हणून तिकडे गेले, त्यांना परत घेतो. ही मूळ शिवसेनेची ताकद आहे. बाळासाहेबांच्या अनेक कार्यकर्त्यांवर मोहजाल टाकले आणि तिकडे खेचले गेले. डोळे उघडल्यावर ते परत येताहेत, त्यांचे स्वागत आहे. पण सत्तेच्या लोभापायी गेले, पदं उपभोगताहेत अशा गद्दार आणि नालायकांना परत घेणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.