![uddhav (1)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/uddhav-1-696x447.jpg)
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्यस्तरीय अधिवेशन सोमवारी मुंबईतील मुलुंड येथे होत आहे. या अधिवेशनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहे. त्यांनी या अधिवेशनाला मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांच्या समस्या आणि मागण्या अनेक वर्षांपासून त्याच आहेत. अद्यापही त्या पूर्ण झालेल्या नाहीत. समोर कान बंद करून बसलेले सरकार आहे. सत्ताधाऱ्यांनी शिक्षकांचे ऋण लक्षात ठेवले तर शिक्षकांना काहीही मागण्या करण्याची वेळ येणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आता मधल्या सुटीची वेळ झाली असावी. गुरुजी म्हटले की शाळा आठवते आणि शाळा म्हटले की मधली सुटी आलीच. आपण सर्व त्या वयात शाळेतूनच पुढे आले आहोत. शिक्षक मतदारंसघ आपण लढलो आणि जिंकलो. आपली ताकद एवढी होती की आपल्याला लढण्याची गरज लागलीच नाही. शिक्षक आणि शिवसेना हे नातं कधी जुळेल असे अनेकांना वाटत नव्हते. मात्र आता ते नाते जुळले आहे. सैनिक कधीही बेशिस्त नसतो. त्यांच्यात उत्साह अमाप असतो. जोश, आत्मविश्वास, ताकद यांचे प्रतीक म्हणजे सैनिक असतो. तर शिक्षक म्हणजे काही प्रमाणात चौकटबद्ध जीवन असते. यांची आता सांगड घातली गेली आहे, असे ते म्हणाले.
या वाटचालीकडे बघताना आपण कोणत्या दिशेने जात आहोत, याचा विचार करणेही गरजेचे असते. या अधिवेशनात शिक्षकांनी त्यांच्या अनेक समस्या मांडल्या आणि मागण्याही केल्या. एवढी वर्ष होऊनही शिक्षकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. या मतदारसंघातून आपले आमदार होण्याआधीही या मतदारसंघाला आमदार होतेच. सत्ता येत आणि सत्ता जाते. मात्र, सत्तेत असलेले शिक्षकांचे ऋण मानायला लागले आणि लक्षात ठेवायाला लागले. तर शिक्षकांना काही मागण्याची वेळ येईल, असे वाटत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुलांचा दिवसातला बराचसा वेळ शाळेत जातो. ज्ञान आणि संस्कार पुढच्या पिढीला देण्याची शिक्षकांची जबाबदारी असते. मुलं बराच वेळ शाळेत असतात. त्यामुळे संस्कार देण्याची आणि पुढील पिढी घडवण्याची जबाबादारी शिक्षकांची असते. तुम्ही फक्त गुरु, शिक्षक नाही. संस्कारदूत आहात. आता मराठी शाळा बंद पडत आहेत. ही मांडलेली समस्या दुर्दैवी आहे. आमचे आजोबा प्रबोधनकार नेहमी आठवण सांगायचे की, त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या आईला शाळेत बोलावले आणि सांगितले की याचे गणीत कच्चे आहे. घरी तयारी करून घ्या. त्यावेळी प्रबोधनकारांची आई म्हणाली की, आम्ही धोंडा शाळेत पाठवतो, त्याला शेंदूर लावण्याचे काम तुमचे आहे. तेही काम आम्ही केले तर तुमचे काम काय, असा सवाल त्यांनी थेट शिक्षकांना केला होता, अशी आठवणही त्यांनी सांगत शिक्षकांचे महत्त्व अधोरेखीत केले.
शाळेत येणाऱ्या मुलांना घडवण्याचे काम शिक्षकांनी करायचे असते. त्या वयात त्याच्या विचारांना आकार देत पैलू पाडणे गरजेचे असते. तसेच झाले नाही तर देशात अंदाधुंदीची परिस्थिती निर्माण होते. शिक्षणक्रमात आमुलाग्र बदल केले पाहिजेत, असे म्हणतात. मात्र, नेमके काय करायचे. शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रम ठरवणारा व्यक्ती आणि त्याप्रमाणे शिकवणारे शिक्षक आपल्याला हवे आहेत. मात्र, शिक्षकांना तांदूळ निवडणे, निवडणूक काळात निवडणूक कामाला लावणे आणि फावल्या वेळेत शिकवणे,असे चालू राहिले तर अभ्यासक्रम बदलून काहीही होणार नाही. जोपर्यंत शिक्षकांसोबतच वागणे बदलणार नाही. तोपर्यंत काहीही बदल होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षक आता कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येतात. हे कंत्राटदार कोण, कोणी कोणाला कंत्राट द्यायचे, अशी बिकट परिस्थिती करून ठेवली आहे. आता महापुरुषांचे युग संपले काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. धरावे असे पाय आणि हार घालावे असे गळे दिसत नाहीत. गळे पकडावे अशी माणसे अनेक दिसतात. बौद्धिकदृष्या ठेंगू माणसाच्या लांब सावल्या पडतात, त्यावेळी सूर्यास्त जवळ आल्याचे दिसते. आपला देश सूर्यास्ताच्या दिशेने जात आहे काय, असा सवाल उपस्थित होतो, असा जबरदस्त टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.
एकीकडे महाकुंभसारखा सोहळा सुरू आहे. आता माधी गणपतींचे विसर्जन करायचे नाही, असा आदेश काढले. पीओपीच्या मूर्ती बनवायच्या नाही. ठीक आहे, आम्ही शाडूच्या मुर्त्या बनवतो. पण शाडूची माती देणार कोण? अद्यापही अनेक मुर्त्यांचे विसर्जन झालेले नाही. काही ठिकाणी विसर्जन झालेल्या मुर्त्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. बोलायला आणि सल्ला देण्यास काहीही लागत नाही. मात्र, ते वागतात काय, ते बोलताच वेगळे आणि वागतात वेगळेच. याबाबत रामकृष्ण परमहंस यांनी चांगले सांगितले आहे. घार आणि गिधाड आकाशात भरारी घेतात पण त्यांचे लक्ष जमीनीवर सडक्या आणि कुचक्या मासंवर असते. हे आपण कोणालाही उद्देशून बोललो नाही, असे सांगत त्यांनी टोला लगावला.
शाळांमध्ये सुधारणा झाली पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळा आपण बदलल्या आहेत. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणाचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होते. ते आपण 2014 पूर्ण केले. आपण शिक्षण डिजीटल केले. आता ते सरकारने स्वीकारायला हवे. आपण 8 ते 10 च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम डिजीटल केला आणि मुलांच्या हातात टॅब दिला. ई लर्निंगमुळे, अॅनिमेशनद्वारे विद्यार्थ्यांना चांगले समजते. ई लर्निंग आणि व्हर्चुअल शिक्षण आपण सुरू केले. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावला, असेही त्यांनी सांगितले.
आपण एवढे काम केले आहे. त्यामुळे विधानसभेचा निकाल आपल्याला मान्य नाही. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. मात्र, दिल्लीत त्यांनी शिक्षण, पाणी आरोग्य क्षेत्रात महत्त्वाचे काम केले आहे. जनता हे विसरू शकणार नाही. त्यामुळे निवडणूक निकालात गडबड गोंधळ झाला आहे. हे स्पष्ट आहे. प्रत्येक शिक्षकाला मतदानाचा अधिकार आहे. निवडणूक यंत्रणेचे काम शिक्षकांकडून करून घेऊ शकतात. तर मग शिक्षक निवडणूक प्रचाराचे काम का करू शकत नाही. शिक्षक मनानुसार मत देऊ शकतो तर ते मनानुसार एखाद्या पक्षाचे काम का करू शकत नाही. विधीमंडळात शिक्षकांसाठी वेगळा मतदारसंघ असेल तर त्यांना पक्षाचे काम करायला परवानगी का नाही, असा सवालही त्यांनी केला.
आपले हिंदुत्व हे राष्ट्रप्रेम आहे. त्यामुळे कट्टर राष्ट्रभक्त बनवण्याचे काम शिक्षकांनी केलं पाहिजे. त्यामुळे शिक्षकांनी शिवसेनेचे सदस्यत्व घ्यावे. शिक्षकांनी शिवसेनेचा प्रचार करावा. मात्र, जोपर्यंत हे होत नाही. तोपर्यंत शिक्षकांच्या मागण्या तशाच राहतील. समोर कान बंद केलेले सत्ताधारी असतील, तर या मागण्यांना अर्थ नाही. आपली ताकद सरकारला दाखवण्याची गरज आहे. जनता सांगते हे निवडणूक निकाल मान्य नाही. आता त्यांनी मारलेल्या थापा सगळ्यांना सांगण्यात काय हरकत आहे. लाडकी बहीणमधून 5 लाख नावे वगळली आहे. लाडका भाऊ योजना बंद, 1 रुपयात पीकविमा बंद तसेच आपली महत्त्वाची शिवभोजन योजना बंद करण्याचा विचार आहे. असे सरकार असेल तर ते आपल्याला बदलावेच लागेल. अंधार दूर करण्यासाठी शिक्षकांना आता हातातील मशाल घेऊनच पुढे जावे लागेल आणि शिक्षक ते करतीलच, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.