शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद मुंबईतील दादरमधील शिवाजी मंदिरात पार पडली. यावेळी लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र धर्माच्या मुद्द्यावरून केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर वज्राघात केला.
‘लोकसभेच्या निमित्तानं एक वातावरण देशात झालं की आताचं हे सरकार दुर्दैवानं परत सत्तेत बसलं आहे, हे संविधान बदलायला निघालं होतं. त्याच्या मनातलं काळं बाहेर आलंच होतं. आता ते कितीही म्हणो की हा फेक नरेटिव्ह, हा त्यांचाच शब्द आहे त्याला ते बळी पडले. तसं नाही, शेवटी अनुभवाचे बोल जास्त महत्त्वाचे आहेत. गुरू हा लागतोच मात्र अनुभवासारखा दुसरा गुरू नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आजच्या निकालावर बोलताना ‘जो काही निकाल जम्मू-कश्मीर किंवा हरयाणात लागला आहे हे प्रत्येक राज्य आणि राज्यातील जनता आपापल्या अनुभवाला जागून निर्णय घेत असतं’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘गुजराती आणि मराठी असा वाद कधीच नव्हता आणि तो होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. पण तुमच्याच भाषेत तुम्ही जे सांगितलं की ठग तिथे बसलेत, एक मान्य करावं लागेल की त्यांनी गुजारात आणि संपूर्ण देश अशी भिंत बांधली आहे’, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
न्यायहक्क मागणं हा काही गुन्हा नाही!
‘अयोध्येत का हरले? वाराणसीात मतांचे अंतर का कमी झाले? अयोध्येत हिंदूत्ववादी नाही का? अयोध्येत जिथे घाईघाईत, गळकं राम मंदिर बांधल. निवडुणकीच्या आधी उरकायचं म्हणून तो कार्यक्रम उरकला. एवढं होऊन सुद्धा तो तिथला तिथला राम तुम्हाला का पावला नाही? अयोध्येत तुमचा पराभव कुणी केला? याचं कारण जे कारसेवक तिथे गेले होते त्यांनी बलिदान दिलं ते कशासाठी दिलं? भाजपच्या मर्जीतल्या कंत्राटदारांना सारं देण्यासाठी का? आता पुजारी देखील तिकडून आणताहेत. का करताहेत हे सगळं? शिवसेना जी स्थापन करण्यात आली ती यासाठी की प्रत्येक राज्यात तिथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे, महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आम्ही इतरांचे शत्रू आहोत. न्यायहक्क मागणं हा काही गुन्हा नाही. असंत उद्धव ठाकरेंनी ठणकावलं. न्यायहक्क माणगं हा गुन्हा असल्याचं संविधानात लिहिले नाही. तो प्रत्येकाला त्याचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे’, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
तर तो आमचा हिंदू आहे हे आमचं धोरण!
‘शिवसेनाप्रमुखांचं असं मला एक वाक्य दाखवा की सर्व मुसलमान आपले शत्रू असल्याचं ते म्हणाले आहेत. आमचा लढा जो आहे तो महाराष्ट्र प्रेमी, देशप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही- देशद्रोही, असा आहे. या देशासाठी मी जीव द्यायला तयार आहे असं कुणी बोलणारा असेल अशी लोकं होऊन देखील गेली आहेत. देशात जात पात धर्माने कुणीही असला तरी तो आमचा हिंदू आहे हे आमचं धोरण आहे’, असं त्यांनी स्पष्ट केलं.
‘शिवसेनाप्रमुख आधी भाषणाच्या सुरुवातीला जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं म्हणायचे. त्यानंतर हिंदूंवर अनयाय होत असल्याचं लक्षात आल्यावर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं म्हणू लागले. लोकसभेत जेव्हा मला लक्षात आलं की संपूर्ण देशावरतीच एक घाला आला आहे, म्हणून ‘मी लोकसभा निवडणुकीत भाषणाला सुरुवात करताना जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी सुरुवात केली तर काय चुकलं? काय देशभक्तांमध्ये, हिंदू, मुसलमान – ख्रिश्चन येत नाहीत? आज सुद्धा महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी जो कुणी माझ्यासोबत येईल तो माझा आहे. हिंदू, मुसलमान, शीख मराठी, हिंदी गुजराती कुणीही असेल तरी तो माझा आहे. महाराष्ट्राचं रक्षण करणं, महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी म्हणून जो कुणी आपल्यासोबत येत असेल तो मला पाहिजे. कारण हे संकटपण फार मोठे आहे. नवीन महाराष्ट्रातील स्वत्व टिकवलं, तरी माझा महाराष्ट्र कित्येक पावलाने पुढारलेला आणि सुधारलेला माझा महाराष्ट्र आहे. ते स्वत्व टिकवा फक्त, बाकी काही नको’, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
‘असं एक क्षेत्र सांगा की जिथे इतर राज्यांपेक्षा माझा महाराष्ट्र मागे आहे, कोणतच नाही. माझा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. हा आपला महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र आहे. आणि असा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पुढे असल्यानंतर काय म्हणून आम्ही या दोन ठगांची गुलामगिरी स्वीकारायची, कोण लागतात तुम्ही आमचे? दुर्दैवाने तुम्ही तिकडे बसलात, आमचंच पाप आहे. कोणी तुम्हाला ओळखत नव्हतं तुम्हाला खांद्यावर बसवून आम्ही नेलं, हे आमचं पाप आहे. हे जाहीररित्या मला कबुल करावं लागतंय. हे दुर्दैवं आहे. पण जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही आमचा खांदा वापरलात. खांद्याचे दोन अर्थ होतात. तेव्हाही तुम्हाला दिला आताही तुम्हाला राजकारणामध्ये खांदा द्यायची इच्छा आहे. आताही आमची इच्छा आहे की राजकारणात तुम्हाला खांदा द्यावा. जनता वाटच बघतेय. पण हा काही मतलबीपणा आहे, हा मतलबीपणा तुमचा लपून राहिलेला नाही. वापरा आणि फेकू द्या, कशासाठी? तुम्ही आहात कोण? देशातली लोकशाही का तुम्हाला संपवायची आहे? जर लोकशाही नसती तर तुम्ही निवडून आला असतात का? आज निवडून आल्यानंतर तुम्ही जी काही लोकशाही खतम करण्याची भाषा करता आहात, नव्हे तशी पावलं टाकता आहात, ही पावलं आता लोकांनी ओळखली पाहिजेत’, असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी पुढे केलं.
लोकांचा आग्रहनामा मला मान्य आहे. पण नुसता आग्रहनामा करून चालणार नाही. मात्र, हा आग्रह जसं जनता आमच्याकडून धरतेय तसा जनतेकडे माझा आग्रह आहे, पहिल्या प्रथम हे घटनाबाह्य सरकार तुम्ही घालवा. हा माझा आग्रह तुम्ही मान्य केलात तर मी तुमचा आग्रह मानण्याच्या परिस्थितीत येऊ शकेन. एकतर्फी आग्रह होऊन चालत नाही. दीड महिन्यापूर्वी षणमुखानंदमध्ये महाविकास आघाडीचा कार्यक्रम झाला. तेव्हा जे जाहीर केलं तेचं सांगतो. काँग्रेसने आता नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने जाहीर करावं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेकांत बघावं. त्यांच्यापैकी कोणीही नाव जाहीर केलं तरी तुमच्या सगळ्यांच्या साक्षींनी माझा आता पाठिंबा देतो. मुळात मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे. महाराष्ट्र हित साधायचं आहे. मला वेडीवाकडी स्वप्नं पडत नाहीत. मी मुख्यमंत्री झालो, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन… तेव्हाच यायचं नव्हतं तुम्ही, पुन्हा कशाला येईन. महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे जे करता येईल, ते ते केल्याशिवाय मी राहणार नाही, हा माझा निर्धार आहे. आणि त्याच्या आड जर ही लोक येणार असतील काळ्या मांजरासारखी तर त्यांच्या पेकाटात लाथ घालणार नाही, असं कोणी समजू नये, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
हा जो काही आपण एक निर्धार केलेला आहे वज्र निर्धार तो फार महत्त्वाचा आहे. तुमचा यात स्वार्थ नाही आणि आमचाही नाही. स्वार्थ आपला एकच आहे माझा महाराष्ट्र आणि माझ्या महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या या स्वाभिमानाने जगल्या पाहिजे. या दोन ठगांच्या गुलामगिरीमध्ये त्या जगू देणार नाही. हा वज्र निर्धार आपला असला पाहिजे. मी गुलामी पत्करणार नाही, का पत्करायची? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा हल्लाबोल केला.
हिंदुत्व हिंदुत्वच आहे, हे कोणावरही अन्याय करणारं हिंदुत्व नाही. मोदींचं जे काही चालतं निवडणुकीपर्यंत ‘सब का साथ’ आणि निवडणूक जिंकल्यानंतर मित्राचा विकास, हे आमचं हिंदुत्व नाही. यांनी एवढा नालायकपणा केलेला आहे की ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळामध्ये साथ दिली सोबत दिली होती हे तिकडे माडीवर चढले आणि आम्हाला लाथा घालायला लागले. हा आत्मकेंद्रीपणा आहे, हा आपल्यालाच नाही तर संपूर्ण देशाला घातक आहे, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
आता एकामागोमाग योजनांचा पाऊस पाडताहेत. अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. पण एक-एक योजना दणादण जाहीर करताहेत. जाऊन समारंभ करताहेत, पैसे देऊन लोक आणताहेत. एसटी बस देताहेत. फुकटच्या साड्या वाटताहेत. आणि मग आल्यानंतर महिलांना विचारताहेत, मिळाले की नाही पैसे तुम्हाला? तू काय घरणं पैसे आणले तुझ्या. आमच्या हक्काचे पैसे तू ढापलेस. एकतर सरकार स्थापन करतानाच 50 खोके घेतलेस म्हणजे गद्दाराला 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500 रुपये? फोडाफोडी करताना लाज नाही वाटली, गद्दारी करताना लाज नाही वाटली. आणि आता आमचेच पैसे आम्हाला देऊन तू महाराष्ट्र धर्माशी गद्दारी करायला लावतोस? हा माझा महाराष्ट्र धर्म नाही, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यसाठी सुरत लुटली होती. हे दोन ठग महाराजांचा महाराष्ट्र लुटताहेत. तोच लुटीचा पैसा वापरून स्वतःची जाहिरात करताहेत. मोठ-मोठे कलाकर जाहिरातीत घेताहेत आणि आम्हाला डोळ्यासमोर काजवे चमकवताहेत, यांचं बजेट किती मोठं असेल. सरकारवर विश्वास नसला तरी सरकारच्या जाहिरातीवर अजून लोकांचा विश्वास आहे. जे फेक नरेटिव्ह म्हणतात ना ते जाहिरातीच्या माध्यमातून हे बिघाडी सरकार दाखवतंय. हे सर्व फेक नरेटिव्ह ते करत आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
आपण एसटीवर बघतो मुलगी शिकली प्रगती झाली. आणि पुढे काय 1500 रुपये देऊन घरी बसवली. कारण काम नाही द्यायला. उपयोग काय त्या शिक्षणाचा? उद्योगधंद्याचा नाही पत्ता. कोविड काळात जे उद्योग आपण आणू इच्छित होतो. गद्दारी करून यांनी सरकार पाडल्यानंतर सगळे उद्योग कुठे गेले (गुजरातला), हे वास्तव आहे. मला या दोन ठगांना विचारायचं आहे, का तुम्ही आमच्या सुखात मीठ कालवताय? का हा भेदभाव करताय? हे वैमनस्य का वाढवताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांना केला.