महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. वाचा त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे…
- भवानी मातेबद्दल आकस असणाऱ्यांना मुठमाती द्यायची असून भवानी मातेचे तेज काय हे महाराष्ट्रद्वेष्ट्या सरकारला दाखवून देण्याची शपथ घेऊ.
- ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीविरुद्ध आहे. लोकशाहीचे एक सुद्धा मत फुटता कामा नये, जर ते फुटले तर पुढच्या इतिहासात आपली फुटीर म्हणून नोंद होईल. त्यामुळे ही हुकुमशाही गाडून टाकण्याची गरज आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्यासाठी ‘400 पार’ने निवडणूक जिंकायची आहे. अमित शहा बोलले की शरियाने देश चालवणार का? नाही, आम्हाला बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावरच देश चालवणार, तुम्हाला संविधान बदलायचे असून आम्ही बदलू देणार नाही.
- 10 रुपयात शिवभोजन आम्ही सुरू केले ते आजही सुरू आहे. मोदी गॅरंटी आणि उद्धव ठाकरे यांचे वचन.. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे.
- मोदी गँरंटी कसली… भ्रष्टाचार करा आणि भाजपात या, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. जर तुम्ही न घाबरता आमच्याशी लढलात तर तुरुंगात टाकू.
- 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतो म्हणतात. त्यांना मोफत धान्य नाही त्यांना रोजगार द्या. त्यांना अभिमानाचे जीवन द्या.
- शेतकऱ्याने वर्षाचे 1 लाखाचे खत घेतले. त्यावर 18 टक्के जीएसटी, म्हणजे 18 हजार सरकारच्या खिशात आणि त्या बदल्यात 6 हजार देतात. उरलेले 12 हजार कोणाच्या खिशात? तुमचाच खिसा कापून तुम्हाला भीक देतात आणि उपकार केल्याचा आव आणतात. ही राजवट परत पाहिजे?
- मोदी एक गोष्ट खरे बोलले की जे काँग्रेसला 70 वर्षात जमले नाही ते आम्ही करून दाखवले. कारण 70 वर्षात जे काँग्रेस लुटू शकली नाही ते यांनी अडीच वर्षात लुटून दाखवले. लुटीचा पैसा सगळीकडे दिसत असून होर्डिंग, जाहिरातीने पेपर बरबटून टाकत आहेत. हा पैसा कुठून आला. हा पैसा कोणाचा आहे?
- निर्मला सीतारमन यांनी निवडणूक रोखे पुन्हा आणणार असे म्हटले. गेल्या दोन, अडीच वर्षात 8 ते 10 हजार कोटी खाल्ले आणि काँग्रेसला म्हणतात तुम्ही देश लुटला.
- अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नागपूरच्या अधिवेशनात 2 लाखांपर्यंत पिक कर्जमुक्त करण्याची घोषणा केली मी होती. पण हे तुम्हाला फक्त ठेंगा दाखवत आहेत मिळत काहीच नाही.
- गेल्या 10 वर्षात विदर्भाचा विकास का केला नाही? एक तरी उद्योग विदर्भात आणला का? कुठे गेले उद्योग तर गुजरात. सगळे उद्योग गुजरातला नेले. महाराष्ट्रबद्दल इतका आकस का? कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागताय?
- गेल्या 10 वर्षात किती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले? किती शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे हे नुकसान भरपाईप्रमाणे मिळाले? शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची दानत तुमच्यात नाही.
- शेतकऱ्यांची तरुण पोरं आत्महत्या करत आहेत. काम नाही, शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करत आहेत. त्यांच्यासाठी कधी दोन शब्द खर्ची घातले का?
- तुमच्याकडून हिंदुत्वाची शिकवणी लावण्याची गरज नाही आणि देशप्रेमाची बातच करू नका. तुमच्या रक्तात देशप्रेम आहे की नाही हे शोधावे लागेल.
- मणिपूरमध्ये काय झाले होते? पंतप्रधान तिकडे गेलेही नाहीत. काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री सुप्रिया सुळे यांना शिवी देत होता. कुठे गेले ते नितीवान भाजपवाले?
- आम्ही काही म्हटले की महिलेचा अपमान. पण तुमच्याच सभेत आमच्या मानगुटीवर बसवलेल्या मुनगंटीवारांनी बहीण-भावाच्या नात्याचा उल्लेख केला, त्यात कोणाचा अपमान झाला?
- आज जे सत्तेत बसले त्यांचा स्वातंत्र्यलढ्याची काडीचाही संबंध नव्हता.
- अमरावतीची भूमी तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांची आहे. तुकडोजी महाराज फक्त भजन, किर्तन करत बसले नाही, त्यांची किर्तने देशप्रेमाने ओथंबलेली आणि क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी होती.
- ही निवडणूक त्यांच्या जीवनमरणाची नाही, तर शेतकऱ्यांच्या आणि तुमच्या-आमच्या जीवनमरणाची लढाई आहे.
- काल एका सभेत पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होताहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल. तुम्ही 10 वर्ष तिथे बसला होतात तर कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटली? आता जास्त मुलं कोणाला आणि कमी मुलं कोणाला होतात हे मोदींना कसं कळते देव जाणे.
- जोपर्यंत शिवसेना-भाजप युती होती त्यावेळी मोदी महाराष्ट्रात किती प्रचारसभांना आले होते आणि आता किती येताहेत? आता अगदी गल्लीबोळात जाताहेत आणि दरवेळी जातीय समिकरणाचे पिल्लू सोडून देताहेत.
- निवडणुकीच्या काळात कोणी पंतप्रधान नसते, ते काळजीवाहू असतात. ते त्यांच्या पक्षाची काळजी वाहतात, म्हणून ते काळजीवाहू आहेत.
- राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रचंड लाट दिसतेय, कदाचित अशी लाट आणीबाणीच्या नंतर आली असेल, पण त्यापेक्षाही मोठी लाट देशात उसळली आहे.
- शिवसेना जे काही करते ते समोरून करते, मागून वार करणारी आमची अवलाद नाही. समोरासमोर या, आम्ही छातीवर वार झेलणारे आणि समोरून वार करणारे आहोत.
- प्रत्येक कट्टर शिवसैनिक हा कधीही गद्दाराला साथ देणार नाही आणि अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
- थापाड्यांची, खोटारड्यांची भ्रमाची लंका जाळण्यासाठी इथे आलो आहोत.