ईडी, सीबीआय आणि आयकची कारवाई तसेच विरोधी पक्षांमधील भ्रष्ट नेत्यांच्या भाजप प्रवेशावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र सतत सभा आणि दौऱ्या करणाऱ्या मोदी-शहांचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मुंबईत दादरमध्ये शिवसेना भवनमध्ये शिवसेनेची पत्रकार परिषद झाली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा जवळपास फायनल झाला आहे. तो लवकरच जाहीर केला जाईल. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांनी आपला एक चांगला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासाठी आणखी काही वेगळ्या गोष्टी असतील तर त्याचा आम्ही समावेश करणार आहोत, अशी माहिती Uddhav Thackeray यांनी दिली.
काँग्रेसने देशासाठी जाहीरनामा केला आहे. मात्र आम्ही तीनही पक्ष आणि महाविकास आघाडीतील जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. राज्याच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे असतील, यासाठी आम्ही काय करू शकतो, याचा विचार सुरू आहे. राज्यात वेगळा काही प्रयत्न होईल, असे मुद्दे आम्ही त्या जाहीरनाम्यात टाकू, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’! प्रचार गीत प्रसिद्ध करत उद्धव ठाकरे यांची गर्जना
‘काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे’, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं. ‘त्यांचा आणि मुस्लिम लीगचा संबंध हा स्वातंत्र्य पूर्व काळापासून आहे. 1940-42 मध्ये जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी होते. स्वातंत्र्यासाठी लढणारी काँग्रेस नको म्हणून तेव्हा मुखर्जी यांनी तिथल्या पश्चिम बंगालमधल्या मुस्लिम लीगसोबत ज्यांनी देशाची फाळणी मागितली होती, त्यांच्यासोबत युती केली होती. म्हणून मोदींना त्या आठवणी ताज्या झाल्या असतील’, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ‘सरसंघचालक मोहन भागवत हे जामा मशिदीत गेले होते. मोदीही आखातात एका मशिदीत गेले होते. इथेही मशिदीत गेलेत. गेल्या काही वर्षांतले त्यांचे फोटो आहेत. मग त्याकडे ते कसे पाहता? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
‘सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्डचं बिंग फोडलं नसतं तर भाजपचं मोदी गेट समोर आलं नसतं. मोदी गेट हा जगातला सर्वात मोठा घोटाळा आहे. सर्वोच्च न्यायालयाने पर्दाफाश केला नसता तर हजारो कोटी रुपये त्यांना कोणी, कसे दिले हे कळलं नसतं. चंदा दो आणि धंदा लो, हे काम पुढेही सुरू राहिलं असतं. हे आता उघड झालं आहे. यामुळे आता त्यांची सत्ता येत नाही. विरोधी पक्षांना पश्चाताप नक्कीच होईल. कारण हे आधी का लक्षात आलं नाही’, असं हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी इलेक्टोरल बॉण्डची पाठराखण करणाऱ्या पंतप्रधान मोदींवर केला.
‘महाराष्ट्रावर संकटं आली होती, तेव्हा मोदी-शहा फिरकलेही नाहीत. आता त्यांच्या हातात दोन महिनेच सरकार आहे. महाराष्ट्र खूप सुंदर आहे, फिरू द्या त्यांना आणि महाराष्ट्राची जनता काय सांगतेय, हेही त्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे आधी समजलं असतं तर त्यांना सतत महाराष्ट्राच्या वाऱ्या करण्याची वेळ आली नसती’, असा घाणाघात उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांवर केला.
‘संपूर्ण देशात हुकूमशाहीविरोधात जनमत तयार झालं आहे. ते फक्त मतदानाची वाट बघतायेत. शेवटी जागावाटप झालेलं आहे. तीन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केलं आहे. आता कुठे बंडखोरी किंवा गद्दारी होत असेल तर ती त्या-त्या पक्षाने जबाबदारीने थांबवावी. बंडखोरी कुठे झाली तर जनता आता कोणाला स्थान देणार नाही’, असं उद्धव ठाकरे यांनी सांगलीत विशाल पाटील यांच्या बंडखोरीवरून सुनावलं.
‘राज्यघटना बदलायची आहे म्हणून आपल्याला 400 पार करायचं आहे’, असं भाजपचेच कर्नाटकमधील माजी मंत्री हेगडे म्हणाले होते. राजस्थानमधील एका महिला नेत्यानेही असंच वक्तव्य केलं आहे. यामुळे भाजपचा डाव उघड झाला आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे. देश हा आपला धर्म म्हणून आपण एकत्र आहोत. जे देशभक्त आहेत त्यांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे. देश वाचला तर आपण वाचू आणि आपण वाचलो तर आपला धर्म वाचेल. म्हणून पहिल्यांदा हुकूमशाही हटवा. माझं आव्हान हुकूमशाहीला आहे आणि आवाहन देशप्रेमी जनतेला आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘महाराष्ट्रात आम्ही सर्वच्या सर्व 48 जागा जिंकू. कारण त्यांचा 45 चा आकडा हा संपूर्ण देशाचा आहे. माझा केवळ महाराष्ट्राचा आहे’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह महायुतीला टोला लगावला.
‘विरोधी पक्षातील 3 टक्के लोकांवरच ईडी, सीबीआय आणि आयकरची कारवाई झाली’, असे एका मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्याचा समारचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. ‘ते जे विरोधी पक्षांना भ्रष्टाचारमुक्त करताहेत, याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्यांना विरोधी पक्षात कोणी भ्रष्ट असलेलं चालत नाहीये. ही चांगली गोष्ट आहे. सगळेच भ्रष्ट ते स्वतःकडे घेत आहेत. म्हणजे व्ह्यॅक्यूम क्लीनर सारखं धुळ गोळा करण्याचं काम भाजप करत आहे. भ्रष्टाचारी गोळा करत आहे. कुठे कुठे भ्रष्टाचारी आहे ते पाहून मोदींचा व्हॅक्यूम क्लीनर फिरतोय. सर्व भ्रष्टाचारी भाजपमध्ये घेत आहेत’, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
‘माझं धनुष्यबाण चोरलेलं आहे ते चोर आहेत. नाव चोरलंय, वडिलांचा फोटो चोरलाय. कारण त्यांचं कर्तृत्व नाहीये. त्यामुळे चोरीच्या मालावर ते श्रीमंती दाखवत आहेत. पण चोर हा चोरच असतो’, असा टोला धनुष्यबाणची जाहीरात करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी लगावला. ‘ज्यांना आपल्या कामावर विश्वास नाही ते श्रीरामाचं नाव घेऊन मत मागत आहेत. प्रभू श्रीराम ही अशी शक्ती आहे, जी न्याय देईल. न्याय-अन्यायाचा निवाडा ही शक्ती करेल. काम न करणाऱ्यांना ही शक्ती नक्कीच धडा शिकवेल’, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
‘सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. सर्वच जण गुजरातमधूनच का पकडले जातात? यामुळे गुजरातची बदनामी होतेय. यात गुजरातचा दोष नाही. आमचे गद्दारही गुजरातला पळाले होते. हे पण गोळीबार करून गुजरातला पळाले. हे काय आहे? ड्रग्जही गुजरातमध्ये उतरतात, असं का होतंय? दुसरीकडे गुजरातमध्येही भाजप विरोधात निदर्शनं होत आहेत. आता गुजरातमधूनच भाजप तडीपार होईल’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.