पंतप्रधान मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र’ योजना सुरू केलेली दिसते…; अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरे यांचा वज्राघात

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अर्थसंकल्प मांडला. पण या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशला झुकतं माप देण्यात आलं. महाराष्ट्राच्या तोंडाला केंद्रातील मोदी सरकारने पानं पुसली आहेत. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला फटकारले आहे. पंतप्रधान मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र’ ही योजना सुरू केलेली दिसते, असा वज्राघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. यावरून विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी ‘नावडता’ महाराष्ट्र ही योजना सुरू केलेली दिसते. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली. पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? पण दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले आहे तोपर्यंत हा अन्याय सुरूच आहे. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे! असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेश तुपाशी तर ट्रिपल इंजिनवाला महाराष्ट्र मात्र उपाशी, मिंधे राजवटीच्या लाचारीमुळे महाराष्ट्राकडे पुन्हा केंद्राचं दुर्लक्ष!, अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे. आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात बिहारमधील पायाभूत सुविधा आणि योजनांसाठी 58,900 कोटी रुपयांची तर आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. बिहारमधील अनेक रस्ते प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी तर पिरपेंटी येथे 2400 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारणीसाठी 21,400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पुराचा सामना करण्यासाठी आणि मदतीसाठी 11,500 कोटी रुपये दिले जातील.

आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यांतर्गत समस्यांचे निवारण करून पाणी, वीज, रेल्वे, रस्ते या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठी, पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. ‘देशाला न्याय देणारा अर्थसंकल्प’, असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्या सत्तेला टेकू देणाऱ्या राज्यांनाच त्यांनी कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. महाराष्ट्राच्या पदरी नेहमीसारखाच ठेंगा आला आहे. सतत दिल्ली दरबारी झुकणाऱ्या मिंध्यांच्या लाचारीमुळे महाराष्ट्राकडे पुन्हा एकदा केंद्राचं दुर्लक्ष झालं आहे, असा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे.