मिंधे आणि भाजपसोबत सत्तेत जाण्याआधी दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीसाठी मास्क आणि टोपी घालून विमानाने प्रवास केला व त्यासाठी स्वतःचे नावही बदलले होते, अशी जाहीर कबुली अजित पवार यांनी दिली होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजप व केंद्र सरकारला फटकारले आहे.
”आपल्या एअरपोर्टची सुरक्षा व्यवस्था किती बोगस आहे ते यातून समोर आले आहे. राज्याचा विरोधीपक्ष नेता वेषांतर करून देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो हे गंभीर आहे. अशा प्रकारे सुरक्षा यंत्रणाना चकवा देऊन अशा गोष्टी करणे हे गृहमंत्र्यांना तरी मान्य आहे का? सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन हे सगळं केलं जातंय. असे सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करणाऱ्या व्यक्तीला तो गृहमंत्री पदावरच राहण्याचा हक्क नाही, आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत ते”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ”अत्यंत घृणास्पद कामं करणारी लोकं सत्तेवर बसली आहेत. हे अमानुष आहे. ही लोकं कुटुंब बघत नाहीत. मुलाबाळांवर घाणेरडे आरोप करून त्यांचं आयुष्य बरबाद करायचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्यांना जशी मुलं आहेत तशी त्यांनाही मुलं आहेत. त्यांच्या मुलांना जर अशा घाणेरड्या, खोट्यानाट्या गोष्टीत गोवण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी कळेल की आई वडिलांचं दुख काय असतं. मी परत एकदा सांगतो की पूर्वीचा भाजप वेगळा होता. आताचा भाजप हा घृणास्पद व अमानुषपणे काम करणारा आहे. ही वृत्ती महाराष्ट्रातून नष्ट झालीच पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.