देवाभाऊ, गद्दाराच्या जिल्ह्यात छत्रपतींचं मंदिर बांधणं अवघड वाटत असेल तर त्याला डोक्यावर घेतलंच कशाला? उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांची अमरावतीमधील दर्यापूर येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मिंधे भाजप सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र मुंबई लुटण्याचे जे प्रकार भाजप मिंधे सरकारकडून सुरू आहेत त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘सबकुछ मोदी आणि जमीन अदानी हे अजिबात चालणार नाही. आम्ही चालू देणार नाही. तुमचे हे जे सगळे मनसुबे आहेत. ते पाताळात गाड़ून टाकू’, असा घणाघात केला.

”ही निवडणूक महाराष्ट्र प्रेमी व महाराष्ट्र द्रोही याच्यातली आहे. आपण सर्व महाराष्ट्र प्रेमी म्हणून एकवटले आहोत. समोर सर्व महाराष्ट्र द्रोही आहेत. आपलं चांगलं चाललेल सरकार गद्दारी करून पाडलं. जी गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात नाही ती मिंध्यांच्या रक्तात आहे. महाराष्ट्राच्या हक्काचं जे काही आहे. हे ते सर्व ओरबाडून गुजरातला नेत आहेत. मग हे महाराष्ट्र प्रेमी होऊ शकतात का? म्हणूनच मी आता मैदानात उतरलो आहे. मला अभिमान आहे की महाविकास आघाडी एवढी मिळून मिसळून काम करतेय. जे काही करतोय ते महाराष्ट्राच्या हिताचं करतोय. वानखेडेजी मी तुम्हाला धन्यवाद देतोय की लोकसभेची जागा तुम्ही शिवसेनेला निवडून देत आलात. गद्दाराने आधीच इकडे वाट लावली होती. म्हणून 2019 ला ही जागा गेली. 2024 ची निवडणूक आली काँग्रेसने या जागेची मागणी केली. काँग्रेसने वानखेडेंचं नाव सांगताच मी एका क्षणात त्यांनी ही जागा दिल्याचे सांगितले. माझ्यासोबत विधीमंडळात काम करणारा माणूस, चांगला माणूस देशाच्या लोकसभेत जात असेल तर मी उगाच खेचाखेची कशाला करू. आपल्या हक्काच्या माणसाला दिल्लीत पाठवला. लोकसभा तुम्हाला दिला आता आम्हाला दर्यापूर पाहिजे असे मी त्यांना सांगितले. काँग्रेसनी सुद्धा एका क्षणाचा विलंब न लावता साहेब नुसती देणार नाही तर निवडून आणून देणार असे सांगितले. एवढ्या लवकर आपण मिळून मिसळून गेलो त्यासाठी मी तुम्हाला हात जोडून धन्यवाद सांगतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असं कर्तृत्व महाराष्ट्राने लोकसभेला करून दाखवलं आहे. माजलेल्या सत्ताधाऱ्यांच्या बुडाखाली महाराष्ट्राने ठिणगी पेटवली आहे. एक काळ असा होता की आपण त्यांच्यासोबत होतो. चाळीसच्यावर खासदार होते. यांना आपण खासदार दिले. आमदार दिले. वरची खालची सत्ता दिली. त्यानंतर यांच्या डोक्यात हवा गेली. मग हवा काढायला नको का?. सर्व सामान्य जनतेच्या आशिर्वादाने हे जे गॅसचे फुगे फुगले होते व वर वर जात होते. त्याला आपण टाचणी मारली आणि आला फुगा खाली. आता पुन्हा एकदा तेच करून दाखवायचं आहे. इथले जे खासदार होते ते कोणत्या मस्तीत होते ते तुम्हाला माहित आहे. एका साध्या व्यक्तीने तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने त्या गर्वाला पायदळी तुडवून टाकलं. हेच पुन्हा करायचं आहे. गजाननाच्या हातात मशाल दिली आहे. समोर एक गद्दार उभा आहे. अडीच वर्षापूर्वी यांनी केलेल्या गद्दारीने जी जखम झाली आहे ती जखम भळभळतेय. ती जखम घेून आपण वाट पाहत होतो सूड उगवण्याची. तो दिवस आता 20 तारखेला येतोय, असं उद्धव ठाकरे यांनी सांगताच जनतेतून पन्नास खोके एकदम ओके च्या घोषणा दिल्या गेल्या.

आपण तिघे भाऊ भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ

”आपल्या सरकारचं काय वाईट चाललं होतं. पाच वर्ष तरी पूर्ण करू द्यायची होती. त्यानंतर मी काय वाईट करत होतो ते बोंबलून सांगायचं होतं. अडीच वर्षात शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती केली होती. ती कर्जमुक्ती केल्यानंतर कधीच तुमच्यासमोर येऊन मी शो केला नाही. कारण मी तुम्हाला जे कर्जमुक्त केलं. ते तुमच्यावर उपकार नव्हते केले तर मी माझं कर्तव्य पार पाडलं होतं. कमीतकमी त्रासात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याला कर्जमुक्त करून दाखवलं होतं. मी कधीच अहंकराने शेखी मिरवली नव्हती. मी खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हतं केलं. आज याचं जे काही सुरू झाले. सगळे भाऊ. देवा भाऊ, दाढी भाऊ, एक जॅकेट भाऊ. यांच्यात भाऊंबंधकी एवढी झाली आहे की एका बाबतीत यांचे एक मत झाले आहे. आपण तिघे भाऊ भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. महाराष्ट्र गिळतायत, खातायत, ओबाडतायत. आता भले यांना महिलांसाठी प्रेम आलं असेल. पण महिलांच्या सुरक्षेचं काय. महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडतायत. बदलापूरमध्ये जे घडलं. त्या मातेने काय करायचं? चिमुरड्या मुलीवर शाळेत अत्याचार होत असेल व तिच्या आईच्या तक्रारीची कुणी दखल घ्यायला तयार नसेल तर काय चाटायची आहे का तुमची पंधराशे रुपयाची मदत. भाऊ भाऊ म्हणता. तिन्ही भावांनी जर तुमचं तोंड दाखवण्यासारखं असेल तर त्या माऊलीला भेटा आणि मी आहे तुझा भाऊ हे घ्या पंधराशे असं सांगा त्यांना. ती माऊली पहिलं पायातान काढून तुमचं तोंड फोडून काढेल. माझ्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तुम्ही मला लाच देता. यांच्यासारखं नाटक, थोतांड महाराष्ट्रामध्ये कुणी केलं नव्हतं. महाराष्ट्रातले जे काही संस्कार आहे ते हे पुसून टाकत आहेत. सबकुछ मोदी आणि जमीन अदानी हे अजिबात चालणार नाही. आम्ही चालू देणार नाही. तुमचे हे जे सगळे मनसुबे आहेत. ते पाताळात गाड़ून त्याच्यावर आमच्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर करणार

”आमचं सरकार पाडलंत पण तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला. भाजप जे म्हणेल ते हिंदुत्व मानायला मी तयार नाही. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. चांगलं काम केलं असतं ना तर या जनतेने तुम्हाला आज सुद्धा डोक्यावर घेऊन नाचले असते. आता सांगाताय की शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार, मग अडीच वर्ष अंडी उबवली का तुम्ही. शिवसेनेचे मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आपण पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. आज मी माझ्या जनतेला वचन देतोय. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव माझ्या शेतकऱ्यांचं एक रुपयाचं नुकसान होऊ न देता स्थिर करून दाखवणार आहे. शेतकऱ्याला त्याचा हमी भाव देऊन जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवून दाखवेन, असे वचन या सभेत उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिले.

छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माफी का मागितली नाही

”हे मिंधे भाजप सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा ईव्हीएम सारखा वापर करतायत. लोकसभा निवडणूका आल्यानंतर वाजत गाजत ते कोकणात आले व तिथे उभारलेल्या पुतळ्याचे घाई घाईत उद्घाटन केले. तो पुतळा आठ महिन्यात कोसळला. आमच्या दैवताचा पुतळा पडतो. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर होत्या. म्हणून त्यांनी आम्ही महाराजांचे भक्त आहोत असे नाटक केलं. अशुभ हाताने तो पुतळा उभारला होता. आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातच काय आम्ही सुरतेला देखील मंदिर बांधू. पण देवाभाऊ यांना छत्रपती शिवाजी महाराज सहनच होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज बोलल्यानंतर यांच्या अंगाची लाहीलाही होते. त्यानंतर फडणवीसांनी मला आव्हान दिलं की मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवा. देवा भाऊ जाऊ तिथे खाऊ. मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावर जे शिल्प आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, जिजाऊ आहेत, तुकाराम महाराज आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा येऊन तिथे बघा. तुम्ही ज्या मुंब्र्याबद्दल बोलताय ते मुंब्रा हे ठाणे जिल्ह्यात येतं. ज्या जिल्ह्यातून तुम्ही आमच्यातला गद्दार फोडला व मुख्यमंत्री म्हणून त्याला डोक्यावर बसवला. त्या गद्दाराच्या जिल्ह्यात तुम्ही मंदिर बांधू शकत नसाल तर मी बांधून दाखवतो. राजकोटला जो पुतळा उभारला होता तो वाऱ्यामुळे पडला. पुतळा पडल्यानंतर अजित दादांनी माफी मागितली, मोदींनी देखील गुर्मीत दादागिरी सारखी माफी मागितली. पण देवेंद्र फडणवीसांनी अजूनही माफी का मागितली नाही या प्रश्नाचं उत्तर द्या, असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसाना केला.

महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तोंको बांटेंगे

”भाजपची एक घोषणा आहे बटेंगें तो कटेंगे. पण खरंतर यांची घोषणा वेगळीच आहे हम महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तोंको बांटेंगे. पण आम्ही त्यांना लुटू देणार नाही. महाराष्ट्र तोडू देणार नाही. स्वावलंबी व सर्वोत्तम महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन मी लढायला निघालो आहे. देवेंद्र फडणवीसांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. टाटा एअरबसचा जो प्रकल्प नागपूरला येत होता तो प्रकल्प देखील गुजरातला गेला. ज्या विदर्भाने तुम्हाला एवढं काही दिलं त्या विदर्भाची देखील तुम्हाला पर्वा नाही’, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.