शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या रायगड दौऱ्यावर असून गुरुवारी संध्याकाळी रोहा येथील उरूस मैदानावर उद्धव ठाकरे यांची विराट सभा पार पडली. यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंधे गटावर सडकून टीका केली. ”आम्ही हिंदुत्व सोडलं असं म्हणाऱ्यांना मला सांगायचं आहे की आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं आहे तर भाजपचं हिंदुत्व घर पेटवणार आहे. या भाजपचं राजकारण मी चुलीत घातल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.
आज आपल्या सोबत मुस्लीम समाज देखील आलेला आहे. मंदिरात गेलो तिथे देखील सर्व समाजाचे लोक होते. सगळेच सोबत येत आहेत. हे शिवसेनेचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं आहे तर भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे. त्यांचं राजकारण आम्ही चुलीत घालणारच. जातीपातीत, धर्माधर्मात, समाजात भांडणं लावायची आणि त्याच्यावर पोळ्या भाजायच्या असं वैचारिक दारिद्र्य आमच्याकडे नाही. ज्या दिशेने हे देशाला घेऊन जात आहेत. त्यात ते सर्व शासकीय यंत्रणांना घरगड्यासारखे वापरत आहेत. त्यामुळे माझा विश्वास हा तुमच्यावर, धावीर महाराज व आई जगदंबेवर आहे. आम्ही देशप्रेमी, देशभक्त आहोत. आम्ही कोणत्याही व्यक्तीचे अंध भक्त नाही. जो जो हा देश आपला मानतो त्याला मी आपला मानतो. देशात हुकुमशाही नको म्हणून आपण सर्व एकत्र आलो आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
” 26 जानेवारीला अनेकांनी मला प्रजासत्ताक दिनाचे मेसेज केले. मी सर्वांना रिप्लाय देत बसलो नाही पण मनात एकच प्रार्थना केली की पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिन येऊ दे. पुन्हा जर तेच सत्तेत आले तर पुन्हा कधी या देशात प्रजासत्ताक दिन येणार नाही. कारण हा देशच प्रजासत्ताक राहणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
”आपल्याशी यांनी जो खेळ केला. आपल्या बाबतीत कसा उफराटा न्याय दिला ते तुम्ही बघितला. कायदा धाब्यावर बसवून शिवसेना चोरांच्या हातात आली. तुमच्यात हिंमत असेल तर या सभेतून चालत य़ा आणि मग सांगा शिवसेने कुणाची ते. ज्या शिवसेनेने पिढ्यान पिढ्या घडवल्या. त्या पिढ्यांमधल्या एक पिढीतली काही माणसं गद्दार निघाली तर पूर्ण शिवसेना गद्दारांची होऊ शकत नाही. तुम्ही अंगावर येताय़ तर या पण तुमच्याकडे फौज नाही. तुमच्याकडे भाडोत्री गद्दारांची फौज आहे. माझ्याकडे मूठभर असले तरी निष्ठावान मर्द आहेत. आपला पक्ष त्यांनी चोरला. माझे वडील चोरले. माझे वडील माझे वड़िल आहेत. तुम्हाला तुमच्या वडिलांचा अभिमान नसेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही. तुमच्याकडे ना विचार आहेत, ना नेते आहेत ना आदर्श नाही. भाजप म्हणजे चोर बाजार आहे. मी आज स्वत:ला फडतूस म्हणून घेतो. मी फडतूस आहे तर का आमच्या लोकांच्या मागे लागताय. पाडा मला एकटं. पण जे भेकड आहेत ते शेपूट घालून भाजपसोबत गेले आहेत आणि जे वाघ आहेत ते माझ्यासोबत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि गद्दार गटाला सुनावले
”तसा या अर्थसंकल्पाला काही अऱ्थ नाही खरा अर्थ संकल्प हा जूलै महिन्यात नवीन सरकार सादर करणार. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे येणाऱ्या निवडणूकीच्या आधी मारलेल्या थापा आहेत. हे आधी पासून थापा मारत आले आहेत. आधी बाबरीचं घडलं त्यानंतर हे राम मंदिर राम मंदिर करत होते. अटलजींचं सरकार आलं तेव्हा देखील राम मंदिर नाही बनवलं. मोदी सरकार आल्यावर आम्ही मागणी केलेली की विशेष कायदा करा आणि मंदिर बनवा पण ते त्यांना ते जमलं नाही. राम मंदिराचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता निवडणूका आल्या तसा हा सोहळा केला. दहा वर्ष तुम्ही राम मंदिरावर काढली. दुसरी टर्म संपताना आता हा फार्स तुम्ही केला. आम्हाला राम मंदिर बांधल्याचा आनंद आहे. पण राम मंदिर बांधायला धाडस लागतं. ते धाडस तुम्ही केलं नाही. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राम मंदिर बांधलं गेलं. ते देखील जनतेच्या पैशाने. मग तुम्ही काय केलं. आणि आता दिवसांनी रामनवमी येतेय. रामनवमीला रामाचा जन्म झाला होता. मग त्या दिवशी का नाही केलं राम मंदिराचं लोकार्पण? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.
”2014 ला जेव्हा हे मोदीजी आले तेव्हा आम्हाला वाटलेलं की हे पाकिस्तानला हे चांगल्या भाषेत उत्तर देतील पण तसं काही झालंच नाही. तर दुसरीकडून चीन घुसतोय. केवढं ते दुर्देव. चीनकडे बघण्याची यांची हिंमत नाही आणि हे आमच्या माणसांच्या मागे ईडी लावतायत. जा हिंमत असेल तर त्या चीनच्या मागे ईडी लावा. त्यांचा तो कोण राष्ट्राध्यक्ष आहे त्याच्या मागे ईडी लावा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपलला दिले आहे.
वापरा आणि फेका हेच भाजपचं हिंदुत्व
”दहा वर्ष सतत काँग्रेसने काय केलं विचारता. अहो पण काँग्रेसने जे केलं ते तुम्ही विकून खाल्ल. सगळं विकून खाताय. 2014 साली आम्ही असं काय पाप केलं होतं. लोकसभा निवडणूकीत आम्ही तुमच्या सोबत होतो. एकत्र निवडणूक लढलो. चार महिन्यात तुम्ही युती तोडली. एकनाथ खडसेंनी आम्हाला युती तोडल्याचे कळवले. खडसेंनीच कळवले होते की युती तोडायची जबाबदारी त्यांच्यावर होती. चार महिन्यात काय आम्ही धर्मांतर केलं होतं, जे तुम्ही युती तोडली. आता जो काही बाजार मांडलाय. शानदारपणे आमच्यासोबत राहिला असतात तर आता जे पाव उपमुख्यमंत्री आहात त्या ऐवजी अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिला असतात. तुमच्यासोबत संकटाच्या काळात शिवसेना होती ती शिवसेना देखील तुम्हाला आता नकोय. मित्रपक्ष देखील नकोय. तुमच्या पक्षातील चांगले चेहरे होते त्यांनाही तुम्ही वापरता आणि फेकता. हे कसलं हिंदुत्व. तिथे मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत तसंच केलं. रमण सिंह, वसुंधरा आणि इथे देवेंद्रजीं सोबत तसंच केलं. हेच यांचं हिंदुत्व वापरा आणि फेकून द्या.
महाराष्ट्राचं ओरबाडून गुजरातला देणार असाल तर ते होऊ देणार नाही
”आता जे मोदी बाबा महाराष्ट्राच्या वाऱ्या करत होते. त्यांना आता महाराष्ट्र दिसत आहे. महाराष्ट्रात निसर्ग वादळ आलं, तौक्ते वादळ आलेलं तेव्हा कुठे होते हे. एकदा तरी आले. केंद्राने काही दिलं नाही महाराष्ट्राला. आणि आता सगळं ओरबाडून गुजरातला नेतायत. गुजरातला देताय त्याला माझी हरकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये जसं राम मंदिर बांधलं तसं आता तिथल्या लोकांना बिहारच्या लोकांना तिथेच रोजगार द्या. गुजरात समृद्ध करताना माझा महाराष्ट्र ओरबडून नेणार असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही. माझा संताप व्य़क्तीवर नाहीए. पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या मूळावर आलेला आहात. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्ही हे होऊ देणार नाही ”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.
यांच्यातील एकाने मोदींजींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली. महाराजांनी आम्हाला महिलांचा सन्मान करायला शिकवलं आहे. मोदीजी एकदा तरी मणिपूरला गेले का. एक चकार शब्द तरी बोलले का तिथल्या महिलांबाबत. इथे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तिथे दिल्लीत शेतकरी आंदोलन करत होते. आंदोलन करताना काही शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. त्या शेतकऱ्यांना यांनी अतिरेकी ठरवले होते. महाराजांनी सांगितलेलं की शेतकऱ्यांच्या शेताच्या देठाला देखील हात लागला नाही पाहिजे आणि हे शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवणाऱ्यांची तुलना महाराजांसोबत करत आहेत. हे सर्व अंधभक्तच करू शकतात. गेल्या वर्षी अमरावतीत एका संत्र पिकवणाऱ्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याच्या दशक्रियेचं आमंत्रण तेथील शेतकऱ्यांनी मोदीजींना पाठवलं होतं. ही अवस्था आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची”,असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले
” आज अर्थसंकल्पाच्या वेळी हे म्हणतात आम्ही फक्त चारच जाती मानतो शेतकरी, गरिब, महिला, तरुण. या चार जाती काय आता जन्माला आल्या आहेत. आता निवडणूका आल्यानंतर तुम्हाला हे सर्व आठवले. मग गेल्या दहा वर्षात किती नवीन रोजगार आले. महिलांना किती उज्वला योजना मिळाल्या. नवीन काय आलं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मी नेहमी दोन औरंगझेबांचं उदाहरण देतो. तो जो स्वराज्यावर चालून आला. ज्याला दौलताबाद मध्ये गाडलं आहे त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. पण दुसरा औरंगझेब जो देशासाठी लढताना शहीद झाला. देशासाठी लढत असताना अतिरेक्यांनी त्याला मारला. तो आमचा भाऊ होता.
हे जे गद्दार आहेत त्यांना आता उमेदवारी मिळेल का इथपासून सुरुवात आहे. मोदीजी जेव्हा महाराष्ट्रात आलेले त्यांनी घराणेशाहीवर टीका केली होती. मी घराणेशाहीचा वारसा घेऊन पुढे चालतोय आणि हे जे समोर बसले आहेत ते सर्व माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. इथे तर गद्दारांची घराणेशाही आहे. रायगडात सुनील तटकरे, त्यांची मुलगी, मुलगा सर्वच तिकीटाच्या आशेवर आहेत. आता काय मोदीजी यांना सांगणार का मला घराणेशाही मान्य नाही त्यामुळे तुम्हाला तिकीट मिळणार नाही किंवा एकालाच मिळणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
”आजच्या वृत्तपत्रात एक बातमी आहे. हेमंत सोरेन यांना अटक, त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले. त्याच बातमीच्या शेजारी दुसरी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार यांच्या सह अनेक नेत्यांना क्लिन चीट. ही आहे मोदी गॅरंटी. तुम्हाला जेवढं खायचं तेवढं खा. फक्त भाजपमध्ये या मी वाचवेन. हेमंत सोरेन त्यांच्यासोबत गेले असते तर त्यांना अटक केली नसती. मात्र भाजप विरोधात लढायला उभे राहिले त्यामुळे त्यांना अटक झाली. नितीश कुमार भाजपसोबत आले म्हणून त्यांना सोडलं आणि त्याच वेळी लालूंना व त्यांच्या मुलांना चौकशीसाठी बोलावलं, याच हुकुमशाहीला आमचा विरोध आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्य सरकारकडे पैसे नाहीत का, उद्धव ठाकरे यांचा सवाल
मुंबई महापालिकेत आमदार निधीमध्ये विरोधकांसोबत दुजाभाव होत आहे. मंगलप्रभात लोढा यांना 28 कोटी मंजूर, कोटेचा यांना 80 टक्के निधी मंजूर, ते गोळीबार करणारे गद्दार त्यांना 28 कोटी मंजूर. ज्या लबाडाने आपल्या विरोधात निर्णय दिला. त्याला 28 कोटी मंजूर केले. मात्र रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, अजय चौधरी, रईस शेख यांनी पत्र देऊनही त्यांना एक पैसाही मिळालेला नाही. हा उघड उघड निधी वाटप घोटाळा आहे. आमदार तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना निधी देणार. हा जो निधी दिला तो महापालिकेचा निधी आहे. आमदारांना द्यायला राज्य सरकारकडे पैसे नाहीत. हा निधीवाटप घोटाळा आहे. कुठे गेले पैसे. त्यातही टक्केवारी काढली असेल यांनी. या ज्या मोठ मोठ्या जाहीराती लावल्या आहेत. जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून जाहिरात देणारे कमिशन काढत आहेत. करदात्यांचा पैसा हे असे लुटत आहेत आणि तुमचे भाग्यविधानते बनून तुमच्या मध्ये फिरत आहेत. या गद्दारांना आता टकमक टोक दाखवल्याशिवाय राहायचं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे जे ओरडत आहेत की आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून ते आता नितीश कुमारांसोबत गेले आहेत. काही दिवसांपूर्वी हेच नितीश कुमार संघ मुक्त भारत ओरडत होते. ते नितीश कुमार तुम्हाला चालतायत. कश्मीर मध्ये महेबुबा मुफ्तींसोबत बसला होतात. ते चाललं तुम्हाला. हिंदुत्व आम्ही नाही तर भाजपनेच हिंदुत्व सोडलं. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेस नको म्हणून मुस्लीम लीगला घेऊन सरकार स्थापन केलेलं. असे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
”आम्ही शिवभोजन सुरू केलेलं. दहा रुपयांत पोटभर जेवण. आजही मिळतं. पण तुम्ही पाच लाखात मोफत उपचार मिळणार सांगितलं ते कुठे मिळत आहे? 100 स्मार्ट सिटी उभारणार होतात त्या कुठे आहेत. 2 कोटी रोजगार देणार होतात कुठे आहे रोजगार. आज मराठवाडा विदर्भ होरपळतोय आणि यांच्या डोक्यात निवडणूकीचे वारे शिरले आहेत. सगळीकडे जय श्रीराम. पण आता आमचा नुसता जय श्री राम नाही आमचा भाजपमुक्त जय श्रीराम आहे. मी नाशिकमध्ये काळाराम मंदिरात गेलो होते. बाबासाहेबांनी जसा चवदार तळ्यासारखा सत्याग्रह केला होता तसाच एक सत्याग्रह या मंदिरात झाला होता. त्यावेळी बाबासाहेबांनी एक आंदोलन केलं होतं. त्यांनी आंदोलन करून मंदिरात प्रवेश केला होता. राम सर्वांचाच आहे असं त्यांनी सांगितलेलं. हृद्यातच राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”जनतेला आता जागं व्हावं लागेल. पण इकडे जे कुणी भाजप, आरएसएसवाले असतील, त्यांनादेखील सांगायचं आहे की ही तुमच्यासाठी सुद्धा धोक्याची घंटा आहे. आज जे काही आहे त्यासाठी तुम्ही देखील राब राब राबला आहात. किती पिढ्या तुम्ही हे दृष्य पाहण्यासाठी घालवल्या आहे. ही मेहनत तुमची देखील आहे.पण ज्या दिशेने यांची वाटचाल सुरू आहे. तुमच्या पुढच्या पिढीला देखील स्वातंत्र्य मिळायला हवे याचा विचार तुम्ही देखील करायला हवा. देशात सध्या हुकुमशाहीसारखे राज्य आहे. इंग्रजांनी जस राज्य केलं तसं सुरू आहे. इंग्रजांसारखं फोडा आणि राज्य करा सुरू आहे. तरीदेखील क्रांतीच्या ठिणग्या पेटल्या व उठाव झाला. तो लढा कुणी विसरलेले नाही. जे स्वातंत्र्य लढ्यात होते त्यांचे वशंज आजही आहेत. आम्ही स्वातंत्र्य लढात नव्हतो म्हणून कुणाला आमचं स्वातंत्र्य गजाआड टाकू देणार नाही. आमचं स्वातंत्र्या हिरावू पाहणाऱ्यांना आम्ही गजाआड टाकू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
”रणांगणात मर्द उतरतो. माझ्या आजोबांनी एक वाक्य उच्चारलं होतं. शांती ही मुडद्याची असते आणि क्रांती ही मर्दीची असते. आज आपल्याला ठरवायचं आहे की आपण मुडदे आहोत की मर्द आहेत. जे जे भेकड आहेत त्यांना शिवसेनेत स्थान नाही. तुमच्यासमोर ते महाराष्ट्र ओरबाडतायत आणि तुम्ही शेपूट घालून बघत आहात. आम्ही भेकडासारखे ते बघू शकत नाही. जर ते बघत राहलो तर आम्हाला जय शिवाजी जय भवानी बोलायचा अधिकार राहणार नाही. हा जो आमचा भगवा आहे, भाजपने य़ा भगव्याला छेद करण्याचा प्रयत्न केला. हे असे नतद्रष्ट राजकारणी महाराष्ट्राच्या मातीत गाडावीच लागतील. या रायगडमध्ये तुम्ही कुणीही समोर उभा करा. तटकरे आमच्यासमोर उभा राहू शकत नाही. त्यामुळे बाहेरून आणा. त्याच्या पाठिला रायगडाची माती लावतो की नाही ते बघा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप मिंधे गटाला दिले आहे.