
अहिल्यानगर जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किरण काळे यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप मिंधे गटावर जोरदार टीका केली.
”देशात जो अंदाधुंद कारभार माजला आहे. तो दूर करून पुन्हा एकदा आपलं खरं हिंदुत्व राष्ट्रीयत्व याचं रक्षण करणं आणि जनतेची जी काही गाऱ्हाणी आहेत ते ऐकणं. तसंच त्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणून देणं गरजेचं आहे ही मोठी जबाबदारी सर्वांवर आहे. आज गाडगेबाबा यांचं स्मरण करायला हवं. गाडगेबांबांनी सांगितलं की धर्म हा जगायचा असतो सांगायचा नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असं शिकवलेलं नाही. जे आपल्या देशाला आपलं मानतात ते आपले. ज्यांनी या धर्माचा खेळखंडोबा केलेला आहे. त्यांचे राजकारणापुरतं मुस्लीम प्रेम कसं आहे याचे देखील मी दाखले देऊ शकतो. हे निवडणूकीपुरती जी धर्मांधता माजवत आहेत ते देशाला चांगल्या दिसेने नेईल असं वाटत नाही. माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंचं रक्षण करणं हे भाजपचं हिंदुत्व आहे का? न्यू इंडिया बँक बुडवणाऱ्यांचं रक्षण करणं हे यांचं हिंदुत्व आहे का? माझ्या हिंदुत्वाची व्याख्या आहे. भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या का आहे? असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.