मुंबै बँकेवर तुमचे चेलेचपाटे बसलेत म्हणून तो भूखंड त्यांच्या घशात घालताय का? उद्धव ठाकरे कडाडले

पशूसंवंर्धन विभागाच्या मालकीची गोरेगावमधील तीन एकर झागा ही मुंबै बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी दिल्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला होता. त्याबाबतचा जीआर शासकीय संकेतस्थळावर जारीही झाला. मात्र संध्याकाळी तो जीआर हटवण्यात आला. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ”मुंबै बँकेवर यांचे चेलेचपाटे बसलेले आहेत म्हणून तो भूखंड त्यांच्या घशात घालताय का? अशा शब्दात उद्धव ठाकरे राज्य सरकारवर कडाडले आहेत.

मुंबईत अक्षरश: लुटमार सुरू आहे. काल आदित्यने रस्त्या घोटाळ्याचा मुद्दा मांडला. कॉन्ट्रॅक्टरर माझा लाडका ही या सरकारची नवी योजना आहे. आज एक बातमी आली आहे. मुंबै बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने संकेतस्थळावर टाकला व नंतर तो हटवला. पण सरकारने तो जीआर मागे घेतला आहे का? हा भूखंड पशूसंवर्धन खात्याच्या मालकीचा होता. मुंबै बँकेवर तुमचे चेलेचपाटे आहेत. म्हणून तो भूखंड त्यांच्या घशात घालताय का? ही मुंबईकरांची जागा आहे. आमचं सरकार दोन तीन महिन्यात येईल तोपर्यंत जर हा निर्णय रद्द झालेला नसेल तर आम्ही तो रद्द करूच. जे भूखंड ज्या कामासाठी ठेवलं आहेत त्यासाठीच त्याचा उपयोग झाला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

”मुंबईचं कसं अडानी सिटी करण्याचा डाव चालला आहे. धारावीकरांना आम्ही सांगतो की आम्ही तुम्हाला आहात तिथून कुठेही जाऊ देणार नाही . एका धारावीची वीस धारावी करण्याचा डाव जर कुणी रचला असेल तर तो आम्ही उधळून लावू. त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. धारावीकरांना इथे तिथे टाकायचं. धारावीकरांना उचलायचं मुलुंड, मिठागरात टाकायचं, दहिसर नाक्यात टाकायचं आम्ही ते होऊ देणार नाही. धारावीकरांना घर हे धारावीतच मिळायला हवं. धारावीकरांना बेघर करून कोणत्याही विकासकाचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.