शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्याबद्दल मिंधेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे आभार मानले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग आणि लवादाच्या सुनावण्या बिनावण्या हे सगळं नाटक होतं, हे स्पष्ट झालं आहे. चोराने स्वतःच्या तोंडाने कबुली दिली असून सर्वेच्च न्यायालयामध्ये हा फार मोठा पुरावा झाला आहे. आता या गुह्याची शिक्षा दिली गेलीच पाहिजे, असे नमूद करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप आणि मिंधेंना फोडून काढले.
मावळ मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवडमधील नवीन सांगवी येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेला अलोट गर्दी उसळली होती. या गर्दीच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना तडाखे दिले. शिवसेना पक्ष मिंधेंना देण्यावरून उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला. ‘शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबित आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. भाजपचे जे घरगडी आहेत, निवडणूक आयोग आणि लवाद यांनी आपली हक्काची शिवसेना त्या मिंध्याच्या, चोरांच्या हातामध्ये दिली आहे. हे त्या मिंध्यानेच आता उघड केले आहे, असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी मिंधेंच्या कबुलीची बातमीच दाखवली. मिंधे म्हणतात, मी करेक्ट कार्यक्रम केला. अरे मिंध्या, करेक्ट कार्यक्रम तुमचा 4 तारखेला ही जनता करून दाखवणार आहे, असे उद्धव ठाकरे गरजले. मिंधे म्हणाले, मोदीजींना, शहाजींना मी सांगितलं मी माझं काम केलं आता तुम्ही तुमचं काम करा आणि मग त्यांनी खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हे आपल्याला दिलं, म्हणजे हे मोदी आणि शहांनीच केलं हे स्पष्ट झाले आहे, असे नमूद करत सर्वेच्च न्यायालयामध्ये आता हा फार मोठा पुरावा झाला आहे. चोराने स्वतःच्या तोंडाने कबुली दिली आहे. आता याला याच्या गुह्याची शिक्षा दिलीच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
त्या गुजराती कंपन्यांची शटर बंद करू
मराठीद्वेष्टय़ा गुजराती कंपन्यांची मस्ती वाढलीय. महाराष्ट्रात तुमच्या कंपन्या उघडय़ा ठेवायच्या असतील तर मराठी माणसाला नोकरी द्यावीच लागेल, नाहीतर शिवसेना तुमचे शटर बंद केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी बजावून सांगितले. दोन दिवसांपूर्वी गुजरातच्या सूरतमधील एका कंपनीने ऑनलाईन जाहिरात दिली होती. त्यात मराठी माणसाला प्रवेश नाही असे स्पष्टपणे लिहिले होते. त्याचा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले की, गुजराती माणसाबद्दल शिवसेनेला आकस नाही पण मराठी माणसाचा द्वेष कराल, त्याला नोकरी नाकाराल तर अशा मानसिकतेच्या कंपन्यांना महाराष्ट्रातून गाशा गुंडाळून निघून जावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी करताना अचानक सांगितले की मध्यरात्रीनंतर तुमच्या खिशातील नोटा केवळ कागदाचे तुकडे असतील. देशातील जनता अजूनही नोटाबंदीच्या वेदना विसरलेली नाही. 4 जूननंतर मोदी तुम्ही फक्त नरेंद्र मोदी म्हणून शिल्लक रहाल, पंतप्रधान इंडिया आघाडीचा असेल, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. तुम्ही नोटाबंदी केलीत तशी महाराष्ट्र तुमची नाणेबंदी करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. मोदींचे काय करायचे हे आता जनतेनेच ठरवले आहे. मोदी सगळीकडे जाताहेत. लहानपणी ऐकले होते की भूताची भीती वाटली की राम राम राम राम म्हणायचे. भाजपवाल्यांना आता पराभवाच्या भूताची भीती वाटतेय तेव्हा राम राम राम राम करत फिरताहेत. देशभर जाताहेत. कधी नव्हे ते मोदी महाराष्ट्रात गल्लीबोळात जाताहेत. मुंबईत म्हणे रोड शो करताहेत. आणले की नाही शिवसेनेने तुम्हाला रस्त्यावर. आत्ताच रस्त्यावर आणलेय 4 जूनला तुम्हाला आणखी खाली खेचणार असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
संत तुकाराम महाराजांच्या काळात एक मंबाजी होता. त्या मंबाजीच्या बुरसटलेल्या मानसिकतेने तुकारामांची गाथा बुडवली होती. तीच मानसिकता आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना बदलायला निघालीय.
– कधी नव्हे ते मोदी महाराष्ट्रात गल्लीबोळात जाताहेत. मुंबईत म्हणे रोड शो करताहेत. आणले की नाही शिवसेनेने तुम्हाला रस्त्यावर. आत्ताच रस्त्यावर आणलेय 4 जूनला तुम्हाला आणखी खाली खेचणार.
– महाराष्ट्र हा लेच्यापेच्यांचा नाही, मर्दांचा आहे. जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल.
4 जूनला मोदींना भारतमाताच कंत्राटमुक्त करणार
दरवर्षी दोन कोटी नोकऱया देण्याचे आश्वासन देणारे नरेंद्र मोदी सरकारने कंत्राटीकरणावरच अधिक भर दिला. तसेच आता कामगाविरोधी कायदे आणण्याचाही घाट घातला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी यावेळी टीका केली. कंत्राटी नोकरीत काम करूनही नोकरीची शाश्वती नाही. आज आहे उद्या नाही. अग्निवीर योजना ही चार वर्षांसाठी आहे. त्यानंतर त्यांचे काय होणार. बेकार होऊन दारोदार भटकतील, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या या कंत्राटीकरणाच्या धोरणाबद्दल संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मोदीजी, अग्निवीर योजना चार वर्षांसाठी आणताय आणि स्वतŠसाठी मात्र पाच पाच वर्षांनी एक्स्टेन्शन मागताय. बाकी सगळे कंत्राटी आणि तुम्ही मात्र कायमस्वरुपी. मग तुमचेसुध्दा कंत्राट संपवावे लागेल. कामगारांनी चांगले काम करूनही तुम्ही उद्योगपतींनी धार्जिणे कायदे आणणार असाल आणि त्याविरुध्द कामगार रस्त्यावर उतरणार असेल तर येत्या 4 जूनला मोदींना देशाची जनता आणि भारतमाताच कंत्राटमुक्त करेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
मोदी गुजरात – महाराष्ट्रात मीठ का कालवताहेत
देशाचे पंतप्रधान गुजरात आणि महाराष्ट्राच्या सुखामध्ये मीठ का कालवताहेत, दोन राज्यांमध्ये कळत नकळत एक भिंत का उभी करताहेत, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. 92-92 साली झालेल्या जातीय दंगलींमध्ये मुंबईतील गुजराती बांधवांना शिवसेनाप्रमुखांच्या शिवसैनिकांनी वाचवले होते, मोदींच्या भेकड भाकड भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाचवले नव्हते, याचीही आठवण त्यांनी करून दिली.
‘एसंशिं’ आणि ‘देगंफ’
निवडणुकीचे एक महत्त्व असते. निवडणूक म्हटले की, एक गंमत असते. काही काही लोक मजेशीर बोलायला लागलेत. दिल्लीस्वरांची दोन चावी दिलेले माकडे यांच्या हातात कोलीत सापडले. एक माकड आहे दाढीवाले. त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावच उच्चारता येत नाही. माझे नाव घेताना त्यांच्या घशात भाषा अडकते. त्यांच्या वडिलांचे नाव काय ? पक्षाचे नाव काय? ‘एसंशिं’ मिंधेंचा फुलफॉर्म, दुसरे आहेत ‘देगंफ’ भांग पिलेली माकडं, जशी असतात तसे बोलतात, असे उद्धव ठाकरे यांनी मिंधे आणि फडणवीसांना फटकारले.
दोन माकडांना सांगतो बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे
शरद पवारांना प्रश्न विचारला त्यावर ते म्हणाले, काही छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील. लगेच दोन माकडांना कोलीत मिळाले. आता शिवसेना हा काय छोटा पक्ष आहे का रे? आणि मी त्या दोन माकडांना सांगतो, बाप बदलण्याची गरज मला नाही, बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे. माझ्या वडिलांचे नाव चोरून चोरटय़ांनो मत मागता, तुमच्या वडिलांचे नाव सांगितल्यावर तुम्हाला कोणी दारात उभे करणार नाही. सरकार आपल्या दारी, लोक म्हणतील जा घरी, अशी ही नालायक माणसं असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
यावेळी तेजस ठाकरे उपस्थित होते. व्यासपीठावर काँग्रेसेचे नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमआदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, खासदार चंद्रकांत हंडोरे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार, माजी राज्यमंत्री मदन बाफना आदी उपस्थित होते.
धारावीचे कंत्राट रद्द करा मग अदानींवर बोला!
अदानी आणि अंबानींवर मोदी बोलू लागलेत हा जगातील मोठा चमत्कार आहे. मोदीजी, तुम्हाला अदानींबद्दल राग असेल तर त्यांना दिलेली विमानतळं काढून घेणार का, असा माझा सवाल आहे. तुमच्या चेलाचपाटय़ांनी धारावीच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई अदानींच्या घशात घातली आहे. हिंमत असेल तर द्या त्यांना आदेश व अदानींचे कंत्राट रद्द करा आणि मग अदानींवर बोला, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.