शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी गद्दार आमदारांना फटकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ”मणिपूर जळतंय आणि आपले पंतप्रधान व गृहमंत्री देशाचा कारभार सोडून भाजपचे स्टार प्रचारक म्हणून फिरत आहेत’, असा टोला त्यांनी मोदी शहांना लगावला आहे.
”महाराष्ट्राचा मान व अस्मिता पायदळी तुडवली जातेय, तिचं रक्षण करायला मी लढतोय. आज एका सभेत मोदी साहेब बोलले की दाढीवाल्या मिंध्याने या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं. बाळासाहेबांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. मोदीजी पहिलं तर मी तुम्हाला सांगतोय की सारखं बाळासाहेब, बाळासाहेब बोलू नका ते हिंदुहृदयसम्राट होते, तुमचे बालमित्र नव्हते. आणि या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना घेतला होता. जेव्हा तुम्ही माझे गद्दार आमदार सुरतला ढोकळा खायला नेले होते. त्यावेळी आम्ही हा निर्णय घेतला होता. आणि चला तुम्ही नामांतर केलं असं म्हणता. मग ते छत्रपती संभाजीनगर आहे कुठे. आता निवडणूक आयोगाच्या मतदारसंघावर बघितलं तर औरंगाबाद आहे, मग छत्रपती संभाजीनगर आहे कुठे. ज्या तत्परतेने तुमचा नोकर निवडणूक आयोगाने माझं नाव चोरून गद्दारांना दिलं. त्या तत्परतने हे नामांतर केलेलं नाही आणि करायलाही तयार नाही. अजुनही मतदारसंघाच्या यादीत औरंगाबाद आहे. मोदीजी आज तुम्ही कुठे आलेला आहात. औरंगाबाद की छत्रपती संभाजीनगर ते सांगा’, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
”मी मुख्यमंत्री असताना या संभाजीनगरता मेडिकल डिव्हाईस पार्क आणत होतो. ते पार्क नेले गुजरातला. माझ्या मराठवाड्यातल्या किमान एक लाख तरुण तरुणींना रोजगार मिळाला असता. एक पुतळा तुम्हाला उभारता येत नाही आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगर नामकरण करणार. तुमचं छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच प्रेमही झूठ आहे. इकडच्या विमानतळाचं नामकरण छत्रपती संभाजी महाराज केलं होतं त्याला का मंजूरी दिली नाही तुम्ही. पाच वर्ष झालं का अजून नाव नाही बदललं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.