महाराष्ट्र जो काही भूकंप करेल त्याचे तडे यांच्या दिल्लीच्या तख्तालाही पडतील, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

महाराष्ट्र यंदा जो काही भूकंप करेल त्याचे तडे दिल्लीच्या तख्तालाही पडतील, असा घणाघात करत शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत भाजप व राणे कुटुंबाची सालटी काढली. कणकवली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवरून ठाकरे कुटुंबियांवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींना कणकवलीतील दरोडेखोर, गुंडाची घराणेशाही चालते का? असा सवाल केला आहे.

”वैभवच्या घरी गेलो तिथून येताना श्रीधर नाईक चौक दिसला. नाव वाचून अंगावर काटा आला. तो काळ झर्रकन डोळ्यासमोर आला. त्या काळात कोकणात हत्यासत्र सुरू होतं. त्यावेळी आपण हिंमत केली आणि शिवसेनेच्या विनायक राऊत यांना निवडून दिलं. त्यानंतर गुंडागर्दीच्या छायेतलं कोकण शांत झालं. विनायक राऊतांचा पराभव झाला. एखादा माणूस पराभव झाला की खाली बसतो. पण शिवसैनिक तोच असतो जो हरला तरी खचत नाही. खासदार नसतानाही विनायक राऊत मतदार संघात जात असतात. आता मला नरेंद्र मोदींना इथे प्रचाराला बोलवायचं आहे. लोकसभेत बेंबीच्या देढापासून ते घराणेशाहीवर ओरडत होते. आता इथे जे सुरू आहे ती कसली शाही आहे. इकडे तुमच्या पक्षाने जे केलंय त्याला काय म्हणायचं? डोक्यावर बाप बसलाय आणि खांद्यावर पोरं बसली आहेत. तुम्हाला शिवसेनाप्रमुखांची घराणेशाही नाही चालणार. त्यांच्यातले फोडून गद्दार म्हणून घेऊ पण उद्धव ठाकरे नको आहे यांना. ते मला नकली संतान म्हणाले. एवढी मजल गेली यांची. त्यांनी शिवसेना प्रमुखांचा माझ्या माँचा अपमान केला. मोदीजी कोणते संस्कार आहेत तुमच्यावर? आज मोदीजी, तुम्हाला इथल्या गुंडांची घराणेशाही चालते; असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”आज आपण आयुष्याची लढाई लढत आहोत. अमित शहा आपल्याला नकली सेना बोलले होते. आपल्या सरकारने विकासाला स्थगिती दिली असा आरोप त्यांनी केला. मला त्यांना विचारायचं आहे की अमित भाई विकासाची व्याख्या काय आहे? मी माझ्या महाराष्ट्रातला विकास गुजरातला न्यायला स्थगिती दिली होती. यापुढे तर त्यावर बंदीच घालीन. महाराष्ट्रातला पाणबुडीचा उद्योगही तुम्ही गुजरातला नेला. मध्ये मला असं वाटलं होतं लोकसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान कोकणात येतायत तर कोकणाला काही भरघोस देऊन जातील. पॅकेज द्यायचं सोडा ते इथला प्रकल्प घेऊन गेले. आपली मतं घेण्यासाठी त्यांनी घाई घाईत पुतळा उभारला. आठ महिन्यात त्यांचा आव कोसळून पडला. तो पुतळा म्हणजे आमचा आत्मा आहे, आमचे देव आहेत तो. आपले मिंधे दाढी खाजवत सांगतायत. वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. लाज वाटली पाहिजे त्यांना. यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारता येत नाही. पुतळा म्हणजे काय ईव्हीएम मशीन वाटला काय? आणि पुतळा कोसळल्यानंतर आदित्य इथे आला तेव्हा यांनी दादागिरी करत त्याची वाट अडवली. अरे वाट कुणाची अडवतायत. हे बाप लेक पोलिसांवर दादागिरी करत होते. इथला जो कुणी उभा आहे तो सगळ्यांना धमक्या देत सुटलाय. ते जे हत्यासत्रांचे दिवस तुम्हाला मगाशी आठवून दिले ते परत हवे आहेत का तुम्हाला, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

”काल अजित पवारांनी एक गौप्यस्फोट केला. सरकार पाडण्यासाठी जी बैठक झाली त्यात गौतम अदानी आले होते. मी तेव्हापासून विचारतोय की सरकार पाडण्यासाठी एवढे पैसे कुणी दिले? आता तुम्हीच अंदाज लावा की सरकार पाडायला कुठून पैसे आले असतील. यांना सत्तेवर येऊन मुंबई अदानीच्या घशात घालायची होती. आता कोकण अदानीच्या घशात घातलं तर काय करणार तुम्ही. हे जर असं झालं तर तुमच्यावर अन्याय करणारे तेच आहेत. त्यावेळी कुणाकडे दाद मागणार. कुणाकडे तुमच्या मागण्या घेऊन जाणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी कोकणवासीयांना केला.

 

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

”मुंबई गोवा रस्ता होता होत नाही. 200 वर्ष रस्त्याला खड्डा पडणार नाही असे नितीन गडकरी म्हणाले. होते. मला वाटतं हा रस्ताच बनायला 200 वर्ष जातील. तोपर्यंत कोण बसलंय यांना सवाल करायला”

”आम्ही रिफायनरी आणू रोजगार आणू असं हे सांगत आहेत. हे विकासाच्या नावाखाली संपूर्ण कोकण मारून टाकतील. त्यामुळे कोकणातील लोकांचा विरोध असणाऱ्या बारसू रिफायनरीचा प्रकल्प मी रद्द करणारच. मी लोकांच्या विरोधात काही होऊ देणार नाही. पर्यावरणाचे रक्षण करून कोकणचा विकास करून दाखवेन”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हे पंधराशे रुपये देतायत. आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत. तीन हजार रुपयातही फार काही होणार नाही. कारण महागाई एवढी वाढली आहे. 2014 साली गॅस सिलिंडरचा भाव काय होता आणि आता काय आहे तो बघा. रुपयाच्या तुलेनत डॉलरचा भाव एवढा वाढला आहे की पुढच्या काही दिवसात आपली अर्थव्यवस्था कोलमडेल की काय असं वाटू लागलं आहे, अशी चिंता यावेळी उद्ध ठाकरे यांनी व्यक्त केली.

कोकणात शिवसेनाचा पराभव केलेला जन्माला आलेला आहे यावर माझा विश्वासच नाही मुळी. शिवसेना संपवण्याच्या नादात कोकणात भाजप तरी शिल्लक ठेवला आहे का. कोणी एकेकाळी आपली युती होती तेव्हा माधवराव भंडारी होते. आता माधव भंडारी देखील दिसत नाहीत. शिवसेनेवर टीका करायलाही भाजपला बाजारबुणगे लागतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

सावंतवाडीचे दुसरे नतद्रष्ट म्हणतात महाराजांचा पुतळा पडला त्यातून चांगले काहीतरी होईल. यांना जोडे नाही मारायचे तर काय मारणार. हे जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत काही चांगलं होणार नाही तसंच हे जे दिवटे गुंडगिरी करत फिरतायत ते जेव्हा पडतील तेव्हा माझ्या कोकणाचा विकास होईल. महाराष्ट्र जिंकला मग दिल्ली सुद्धा हलेल. महाराष्ट्र जो काही भूकंप करेल त्याचे तडे यांच्या दिल्लीच्या तख्ताला पडतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.