ससंदेत मंगळवारी एक देश एक निवडणूक विधेयक सादर करण्यात आलं. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदानीबाबतच्या विषयावरून देशाचे लक्ष हटविण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याची टीका केली आहे.
”अदानी विषयावरून लक्ष हटविण्यासाठी हा विषय आणला जातोय. वन नेशन वन इलेक्शन लादण्याआधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. निवडणूक आय़ुक्त देखील निवडणूकीतून नेमले गेले पाहिजे. जर निवडणूक आय़ुक्त नेमले जाणार असतील आणि ते आम्हाला निवडणूकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. निवडणूक आयुक्त हा निवडणूकीतून निवडून आला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”तुम्ही साध्या बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला का घाबरता? ईव्हीएममध्ये मी कुणाला देतोय व माझं मत कुणाला जातंय ते कळत नाही. मी दिलेलं मत कुणाला जातेय हे मला कळलंच पाहिजे. तो माझा अधिकार आहे. ईव्हीएमने तो माझा अधिकार हिरावून घेतला आहे. बॅलेटवर आपण शिक्का मारातो आणि तो पेपर घडी करून बॉक्समध्ये टाकतो. त्यामुळे आपल्याला माहित असतं की आपलं मत कुणाला गेलं आहे. ईव्हीएमवर आपण बटन जरूर दाबतोय, दिवा पेटतोय. पण एखाद्या झूमध्ये दाखवल्या प्रमाणे रिसीट दाखवली जाते,पण ती रिसीट कुठे जातेय. त्या रिसीटवरचं मत नोंदवून घेतलं जात नाहीए. व्हीव्हीपॅट मशीनमध्ये ज्या चिठ्ठ्या पडतात त्यांची मोजणी होत नाही. त्यामुळे निवडणूकीची प्रक्रीया पारदर्शक झाली पाहिजे. ती पारदर्शक झाल्याशिवाय अशा प्रकारे ते निवडणूका लादू शकत नाही. मारकडवाडीत 400 लोकांची वस्ती आणि तुम्ही तिनशे पोलीस आणून उभे केले. बॅलेटनवर निवडणूक घ्यायला एवढी भीती का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
”काँग्रेस व भाजपने सावरकर व नेहरूंवर बोलणं सोडलं पाहिजे. मोदींनी नेहरूंवरच रडगाणं बंद करावं. काँग्रेसने देखील सावकरांवर बोलणं बंद करावं. दोघांनीही आप आपल्या वेळी कामं केली. भाजपने सावरकरांना भारतरत्न द्यायला काय हरकरत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तीन वेळा पत्र लिहलं होतं. ती पत्र काय केराच्या टोपलीत टाकली काय?, असे उद्धव ठाकरे म्हणाले
मंत्रीमंडळातला फिरता चषक पहिल्यांदा बघतोय
अडीच वर्षाचं मंत्रीपद दिल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे. त्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी आमचे सुनील प्रभू व संजय पोतनीस हे क्रिकेटचा फिरता चषक भरवतात, पण मंत्रीमंडळातला फिरता चषक पहिल्यांदाच बघतोय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदंही फिरवणार आहात का? ज्यांच्या जोरावर झाले ते फिरते आणि हे कायम असं असणार आहे का? नेते स्वत:च्या खुर्च्या बळकट करून आमदारांना फक्त फिरवणार आहेत हे कळळं पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरे म्हणाले.