”पराभवाची ज्याला खंत असते व पराभव ज्याच्या जिव्हारी लागतो. तोच इतिहास घडवू शकतो. उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. चोरांचं आणि दरोडेखोरांचं राज्य आपल्याला उलथवून टाकायचंय, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला. घाटकोपर येथील शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीला देखील फटकारले आहे.
”काही दिवसांपूर्वीच निवडणूकीचा निकाल लागला. त्या निकालानंतरही तुम्ही शिवसेनेत जल्लोषात येताय. जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाही. याचा अर्थ त्यांना त्यांच्या विजयावर विश्वास बसत नाही. म्हणजे या विजयात घोटाळा आहे. सगळे जिंकल्यानंतर येतात, हरल्यानंतर कुणी येत नाही. पण पराभवाची ज्याला खंत असते व पराभव ज्याच्या जिव्हारी लागतो. तोच इतिहास घडवू शकतो. उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे”, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
”संपूर्ण मुंबई यांनी बरबटून टाकली आहे. एक है तो सेफ है. मला आता मराठी माणसाला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या हक्काची मुंबई आपल्या ड़ोळ्यादेखत ओरबाडून नेली जात आहे. अशावेळी षंड म्हणून बघत बसणार का? चोरांचे आणि दरोडेखोरांचे राज्य आपल्याला उलथवून टाकाव लागेल. ”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांनी केला.
”पक्ष स्थापन केल्यावर त्याला एक हेतू दिशा लागतं. तुमच्यासारखे कार्यकर्ते मर मर मेहनत घेता त्याला काही अर्थ नाही. तुम्ही योग्य वेळी शिवसेनेत आला आहात. मी शिवसेनाच म्हणणार कारण निवडणूक आयोगाला शिवसेना हे नाव दुसऱ्या कुणाला द्यायचा अधिकार नाही. निशाणी बदलली आहे. सगळे बोलत होते उद्धवजी तुम्हीच येणार”, यावेळी उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण असे विचारताच उपस्थितांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेण्यास सुरुवात केली.
”आपल्या मुंबईचा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. योग्य वेळी तुम्ही मशाल, शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे. तुमचे जे काही प्रश्न आहे, तुम्हाला जिथे जिथे माझी मदत लागेल. आमदारांची मदत लागेल. तिथे पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू”, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या शिवसैनिकांना दिला.