शिवसेनेच्या वतीने अवघ्या महाराष्ट्रात संविधान पूजन आणि भारतमाता पूजन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी परिधान केलेल्या भगव्या टोप्या आणि भगवा वेष याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, कित्येक शतके उलटली आपला हिंदुत्वाचा आणि शिवछत्रपतींचा भगवा कायम तेजस्वी आणि ओजस्वी राहिला आहे. जेव्हा देशावर किंवा तिरंग्यावर संकट आले तेव्हा आपला महाराष्ट्र जो भगव्याचा भक्त आहे तो रक्षणाला धावून गेलेला आहे.
तुमचा स्वातंत्र्य लढय़ाशी संबंध नाही
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले काही जण म्हणतात देशाच्या स्वातंत्र्याला दहा वर्षं झाली. तर कोणाला वाटते ज्या दिवशी श्रीरामाचे मंदिर झाले त्याच दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले. ज्यांचा स्वातंत्र्य लढय़ाशी सूतराम संबंध नव्हता त्यांच्या हातात देशाचे स्वातंत्र्य गेले आहे. ते ना देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात उतरले ना संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात उतरले. ते स्वातंत्र्याचा वाटेल तसा अर्थ लावत आहेत. असे खडेबोलही उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि रा.स्व. संघाला सुनावले.
न्यायासाठी कोर्टाचे दरवाजे ठोकून आता हात दुखायला लागले
आज 25 जानेवारीला मतदान दिन आहे. पण या मतदानाची काही किंमत राहिली आहे काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, ईव्हीएममध्ये घोटाळा होतो की नाही ही तांत्रिक बाब आहे. पण सर्व यंत्रणा हाताशी धरून जणूकाही या देशात नागरिक राहतच नाहीत असा राज्यकारभार सुरू आहे. आपले मूलभूत हक्क हिसकावून घेतले जात आहेत. संविधान बदलण्याचे भाजपचे मनसुबे महाराष्ट्राने पूर्ण होऊ दिले नाहीत. गद्दारी करून शिवसेना फोडली आणि चोरली त्यालाही अडीच वर्षे होऊन गेली. न्यायासाठी कोर्टाचे दरवाजे ठोकून आता हात दुखायला लागले, असे फटकारेही उद्धव ठाकरे यांनी लगावले.
मतदान कुठे केले हे कळण्याचा अधिकारही सरकारने काढला
मतपत्रिकेवर मतदान करताना आपण मत कुणाला दिलं ते कळत होतं. आता ईव्हीएमचे बटण दाबतोय, दिवा पेटतोय, आवाज येतोय म्हणजे प्राणी संग्रालयात काचेच्या आढ एखादा प्राणी दाखवतात तसे व्हीव्हीपॅटवर दिसते आणि ती रिसिट खाली जाते की नाही हेही कळत नाही. पण आता माझे मत आत रजिस्टर कुठे आणि कसे झाले हे कळण्याचा अधिकार होता तो अधिकारही सरकारने काढून घेतला. हीच तुमची लोकशाही आहे काय? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
आमच्या हातात व डोक्यावर भगवी टोपी आहे. पण हातात तिरंगा आहे. एका हातात तिरंगा आणि दुसऱया हातात भगवा आहे. हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. घालीन लोटांगण आणि वंदिन चरण असे नाही आणि हे तर वंदन करण्याच्या लायकीचेही नाहीत, अशा लोकांची जागा दाखवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.