माझ्या अंगात प्राण आहे तोपर्यंत महाराष्ट्र लुटायला देणार नाही, उद्धव ठाकरे गरजले

माझे जनतेला, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की कृपा करून आपला महाराष्ट्र गुजरातच्या चरणी व्हायला निघालेल्यांना मत देऊ नका, महाराष्ट्रद्रोह्यांना मत देणं म्हणजे महाराष्ट्राशी केलेली गद्दारी आहे. माझ्या महाराष्ट्राचा घात जो करेल त्याला प्रतिकार करणार म्हणजे करणारच. अंगात प्राण आहे तोपर्यंत महाराष्ट्र लुटायला देणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नाशिक शहरातील सभेत भाजप मिंध्यांवर जोरदार टीका केली.

”मी नेहमी जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. मी काही देवेंद्र फडणवीस नाही. ते नाशिक दत्तक घेणार होते. नाशिकला सो़डलं वाऱ्यावर आणि गद्दारांना डोक्यावर घेतलं. त्यामुळे मी भाकड आश्वासनं घेत नाही. साध्या साध्या गोष्टींची आश्वासनं देत असतो जी मी पूर्ण करू शकतो. माझ्या गेल्या वर्षभरात नाशिकमध्ये तीन सभा झाला. पहिली सभा 23 जानेवारीला होती. असंच सगळं मैदान भरलेलं होतं. त्या दिवशी तिथे अयोध्येत राम मंदिराचा सोहळा तिथे चालला होता. आता महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदी, अमित शहा मला आव्हान देत आहेत की मी अजून राम मंदिरात का नाही गेलो. ते गळत आहे मग कसं जाऊ मी त्या मंदिरात. मोदीजी तुमची गळकी, सडकी मोदी गॅऱंटीला महाराष्ट्रात थारा नाही. ज्याचा विधानसभेशी संबंध नाही असे विषय इथे फेकायचे आणि मतदारांना गांगरून टाकायचं हे सुरू आहे. राम मंदिराचा जो तुम्ही शो करत होतात. एकही शंकराचार्य नव्हते. तेव्हा मी नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलेलो. त्याच मंदिरात आपल्या माणसांना बंदी होती त्यासाठी बाबासाहेबांनी आंदोलन केलं होतं. मोदी मिंध्यांचं आता बाबासाहेबांवर प्रेम उतू जातं आहे. एवढं बाबासाहेबांवर प्रेम उतू जात असेल तर महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक आयोगात बौद्ध समाजाचा प्रतिनिधी का घेतला नाही ते सांगा मग तुम्ही आम्हाल शिकवा, कशाला थोतांड करताय’, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”मोदी सध्या महाराष्ट्रभर फिरतायत आणि खुर्च्यांशी संवाद साधून जातायत. लोकसभेच्या वेळी ते मला नकली संतान वगैरे म्हणाले होते. त्यानंतर महाराष्ट्राने लोकसभेत हिसका दाखवला त्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हाच्या डायलॉगसारखी जबान को लगाम लागलीय. ते मला चॅलेंज देतायत की राहुल गांधींच्या तोंडून हिंदुहृदयसम्राटांचे कौतुक करवून दाखवा. अहो मोदीजी महाविकास आघाडीची छत्रपती शिवाजी महाराज पार्कात जी सभा झाली होती. त्यावेळी राहुल गांधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झाले होते. आणि जर तुमचं हिंदुहृदयसम्राटांवर एवढं प्रेम असेल तर हिंदुहृदयसम्राटांच्या त्या खोलीत मला दिलेला शब्द का मोडलात. ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला पाठिंबा दिला. ती शिवसेना तुम्ही संपवायला का निघालात. समजा मी तुमच्याशी नालायकपणा केला असेल तर माझ्याशी वैर घ्यायला हवं होतं. तुम्ही थेट शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघाला होतात. शिवसेनाप्रमुखांचं नाव घेता आणि गद्दांरांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येता. एवढी लाजिरवाणी परिस्थिती देशाच्या राजकारणात कधी बघितली नव्हती”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

”सगळे गद्दार चोर जर तुम्ही खरोखर मर्दाची औलाद असाल तर माझ्या वडिलांच्या ऐवजी तुमच्या वडिलांचा फोटो लावून दाखवा. मग कळेल स्ट्राईक रेट काय आहे. शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. निवडणूक आयोग ते नाव इतर कुणाला देणार ही गोष्टच मी मानत नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”देवेंद्र फडणवीसांनी शिवाजीपार्कवरून जनतेला आवाहन केलं की निवडणूक म्हणजे धर्मयुद्द आहे. मला त्यांना सांगायचे आहे की धर्मयुद्ध सांगण्यापेक्षा स्वत:ची कर्म काय आहेत ते लोकांना सांगा. मी माझी कर्म सांगतो. कोरोनामध्ये लोकांना वाचवण्यात महाराष्ट्र नंबर 1 वर होता. उत्तर प्रदेशमध्ये गंगेत प्रेतं वाहत होती. गुजरातमध्ये सामूहिक चिता पेटल्या होत्या. पण महाराष्ट्रात मी एकाही मृतदेहाची विटंबना होऊ दिली नाही. ऑक्सिजन, औषधं कशाचीच कमी होऊ दिली नाही, असे उद्ध ठाकरे म्हणाले.

”मी मराठवाड्यात गेलेलो. विदर्भात गेलेलो. तिथून दोन प्रोजेक्ट गुजराला गेले. टाटा एअरबस, मेडिकल डिव्हाईस पार्क यांनी गुजरातला नेले. सगळं काही गुजरात. आमचं भांडण इथे आहे. आम्ही गुजरातचे शत्रू नाही. आमच्या हक्काचे जे काही आहे ते गुजरातला नेताय आणि बेशरमपणे मतं मागायला येताय”

”लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा मोदींच्या सभेत एका शेतकऱ्याने त्यांना कांद्याबद्दल विचारलं त्या शेतकऱ्याला बाहेर काढलं होतं. आमच्या कांद्यांना भाव कधी मिळणार हे विचारणं हा गुन्हा झाला आहे’, उद्धव ठाकरे यांचा सवाल