देशात भाजप धर्मांधतेचे विष कालवतोय; जागे व्हा! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

भारतीय जनता पक्ष देशात धर्मांधतेचे विष कालवतोय, ते भविष्यात देशाला भारी पडणार आहे, असा घणाघात करतानाच, आत्ताच वेळ आहे, जागे व्हा… जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन ही विषवल्ली पेरणाऱयांनाच बाजूला करायला हवे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज देशातील सर्वधर्मीय नागरिकांना केले.

एकीकडे लोकांना तणावग्रस्त आयुष्य जगायला लावायचे आणि दुसरीकडे वक्फ विधेयकाच्या आडून मोक्याच्या जमिनी ताब्यात घेऊन मित्रांना द्यायच्या अशा भाजपच्या धोरणाला शिवसेनेचा विरोध आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेच्या शिवसंचार सेना या नव्या संघटनेचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. त्याप्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. यावेळी भाजपचा वर्धापन दिन, वक्फ विधेयक, माणिकराव कोकाटे आदी मुद्दय़ांवरून त्यांनी भाजपसह नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले.

वक्फनंतर ख्रिश्चनांच्या जमिनींवर भाजपचा डोळा

‘ऑर्गनायझर’ नियतकालिकामधील एका लेखात वक्फनंतर भाजपचे लक्ष पॅथलिक चर्च आणि त्यांच्या संस्थांकडे असणाऱया सात कोटी हेक्टर जमिनीकडे असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचा छुपा अजेंडा ‘ऑर्गनायझर’ने उघड केला आहे. या विधेयकाबाबत भाजपला हिंदूंशी काहीही घेणेदेणे नाही, मुस्लिमांच्या जमिनी घेतल्यानंतर भाजप सरकार वक्फ बोर्डाच्या जमिनी घेऊन त्यांच्या मित्रांना देणार आहे. ‘सिंघम’ चित्रपटातील संवादाप्रमाणे ‘आयी रे आयी अब मेरी बारी आयी’प्रमाणेच भाजपने वक्फपासून सुरुवात केली आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. वक्फ संशोधन विधेयकाविरुद्ध काँग्रेससह काही पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी, काँग्रेसला न्यायालयात जायचे असेल तर जाऊ द्या, शिवसेनेने वक्फबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि यापुढेही वेळ येईल तसे बोलत राहील, असे सांगितले.

भाजपच्या लोकांची रामाचे नाव घेण्याची पात्रता नाही

निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. शेतकऱयांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले, पण मते मिळाल्यावर आता लोकांची फसवणूक केली. प्राण जाये पर वचन न जाये ही प्रभू श्रीरामाची शिकवण आहे. भाजपच्या लोकांची रामाचे नाव घेण्याची पात्रता नाही. शेतकऱयांचा अवमान करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचाही समाचार उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेतला. कोकाटे यांच्यावरच फसवणुकीचा आरोप आहे. गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा न झालेली ती पहिली व्यक्ती असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपने वक्फपासून सुरुवात केली आहे. यानंतर ख्रिश्चन समाजाकडील जमिनी सरकार घेईल आणि हळूहळू बौद्ध, शीख, जैन धर्मांकडे असणाऱया जमिनीही ताब्यात घेईल. मग हिंदू देवस्थानांच्या जमिनीवरसुद्धा त्यांचा डोळा असणार आहे.

रामनवमीला जन्मलात तर प्रभू श्रीरामाप्रमाणे वागा

भाजपचा आज वर्धापन दिन आहे, त्याबद्दल शुभेच्छा देणार का, असे प्रसारमाध्यमांनी यावेळी विचारले असता, भाजपचा वर्धापन दिन आज तिथीप्रमाणे की तारखेप्रमाणे… का सोयीप्रमाणे आहे ते आधी सांगा, मग तशा शुभेच्छा देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. रामनवमी हा भाजपचा जन्मदिन असेल तर प्रभू श्रीरामाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा, श्रीरामांचे जसे राज्य होते, त्यांचे चारित्र्य होते तसे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपने काम करावे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भाजपसोबतची 27 वर्षांची मैत्री हा शिवसेनेने वनवास समजावा का? असा खोचक सवालही त्यांनी केला.