
पूर्वीच्या काँग्रेस राजवटीत समाजासाठी आंदोलने करणाऱ्या शिवसैनिकांना टाडा लावण्याच्या धमक्या तत्कालीन राज्यकर्त्यांकडून दिल्या जायच्या. आताच्या राज्यकर्त्यांकडून पक्ष फोडण्यासाठी पोलिसांचा वापर टोळ्यांसारखा केला जातोय, असे परखड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मांडले. सत्ताधाऱयांकडून जुनी प्रकरणे उखरून काढली जात आहेत, समोरील पक्ष नामोहरण करण्याचे काम चालले आहे. आपण कुठे चाललो आहोत? आपण फक्त जातोय, याचा शेवट काय होणार आहे? असा सवालही त्यांनी केला.
दैनिक ‘सामना’चे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई मराठी पत्रकार संघात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकीय हाणामारी होत असतात आणि त्या झाल्याच पाहिजेत. हाणामारी म्हणजे दंगली नाहीत तर मतभेद, मतभिन्नता, आंदोलने असतात. शिवसेना गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांच्या पाण्यासाठी आंदोलन करत आहे, पण ते होऊ नये म्हणून तिथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पोलीस हा एक महत्त्वाचा घटक आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण मुख्यमंत्री असताना दुर्दैवाने जगातली सर्वात कठीण कोरोनाची परिस्थिती होती, ती हाताळण्याचा तो काळ होता. पोलिसांच्या मदतीनेच आपण ती परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळली होती. पण एकूण जर पाहिले तर पोलीस हेसुद्धा एक शस्त्र आहे. त्या शस्त्राचा वापर कोण कसा करतोय, त्यावर आपला समाज निरोगी राहणार की, रोगी होणार हे ठरत असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भेदरटांकडून समाज सुधारण्याची अपेक्षा काय करणार?
उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेनेने स्मगलिंगविरुद्ध केलेल्या आंदोलनाचे उदाहरणही यावेळी दिले. ते म्हणाले की, स्मगलिंगच्या मालाची होळी करण्यासाठी शिवसेनेचा मोठा मोर्चा निघाला होता. शिवसेनाप्रमुखांना स्मगलिंगच्या मालाची माहिती देणारेही मोर्चात पुढे-पुढे होते. स्मगलर्सविरुद्ध बोलण्याची देशात कुणाची हिंमत नाही, शिवसेनेने केली पाहिजे असे ते शिवसेनाप्रमुखांना म्हणाले होते. पण स्मगलिंगच्या मालाला काडी लावण्याची वेळ आली तेव्हा ते सर्व गायब होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. अशा भेदरट लोकांकडून समाज सुधारण्याची अपेक्षा करता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारे पोलीस बेकार, ऑर्डर्स देणारे मजेत
पोलीस एन्काऊंटर करतात, पण तो खरा की खोटा. कारण एन्काऊंटरचा आदेश देणारे कधीच सापडत नाहीत. जसे बदलापूरच्या अक्षय शिंदेच्या बाबतीत झाले. अक्षय शिंदे गेला. त्याला गोळय़ा घातल्या. ज्यांनी गोळय़ा घातल्या ते पोलीस बडतर्फ झाले, बेकार झाले. पण एन्काऊंटरची ऑर्डर देणारे मात्र मस्त मजेत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही शरसंधान केले. या घटनेतून धडा घेऊन पोलिसांनीही सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे पाळले पाहिजे, वेडय़ावाकडय़ा ऑर्डर्स पाळू नयेत, केवळ दुष्मनाचा काटा काढायचा आहे म्हणून ऑर्डर्स पाळल्या तर अराजकता येईल, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला.
या प्रकाशन सोहळय़ाला ज्येष्ठ साहित्यिक ‘पद्मश्री’ मधु मंगेश कर्णिक, दै. ‘सामना’चे कार्यकारी संपादक व शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, माजी खासदार ‘पद्मश्री’ कुमार केतकर, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चोणकर यांनी केले.
अंडरवर्ल्ड माफिया बाळासाहेबांना दचकून असायचे
करीमलाला, हाजी मस्तान हे अंडरवर्ल्ड माफिया समांतर सरकार चालवत होते, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले. तो धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले की, करीमलाला हा अंडरवर्ल्ड माफिया होता, पण तो हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला ‘मातोश्री’वर यायचा. हाजी मस्तानही त्याकाळी बाळासाहेबांना दचकून असायचा.
प्रभाकर पवार यांचे लेखन निर्भीड
प्रभाकर पवार यांचे पुस्तक वाचताना शिवसेनेचे दिवंगत नेते प्रमोद नवलकर यांची आठवण येते, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्या लेखनाचे कौतुक केले. ते म्हणाले की, प्रभाकर पवार यांनी लेखनातील सातत्य निर्भीडपणे आणि निःस्पृहपणे टिकवले आहे, पुस्तकही उत्तम झाले आहे, असे ते म्हणाले. या गोष्टी आपण फक्त वाचत जाणार आहोत की, यातून खरंच काही करणार आहोत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
समाज जागा होत नाही तोपर्यंत गुन्हे घडत राहतील
छोटा शकील आणि एका न्यायाधीशामधील संभाषणाचा या पुस्तकात अंतर्भाव आहे. त्याचा दाखला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. एखादा गुंड थेट न्यायाधीशांना सांगतो की, ये मेरा काम कर के दो, म्हणजेच त्याला वसुली करायची होती. असे संबंध असतील तर समाजाने न्याय मागायचा कोणाकडे? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. समाजपुरुषाला हजार डोळे, हात आणि पाय आहेत, पण तो ते वापरत नाही तोपर्यंत आपल्यावर समाज म्हणून जी जबाबदारी आहे ती सुधारणार नाही, गुन्हे घडत राहतील आणि गुन्हेगार वाढत राहतील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये पूर्वी क्राइमची बातमी आतमध्ये जायची, हल्लीच्या पेपरमध्ये हेडलाईन येते. कारण पूर्वी होता तो ‘टाइम्स ऑफ इंडिया’, आताचे पेपर ‘क्राइम्स ऑफ इंडिया’ झालेत, म्हणजेच सगळीकडे क्राइमच्या बातम्या छापून येतात. त्याशिवाय पेपर चालणार की नाही, अशी पद्धत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
पोलिसांनी टिपायला पाहिजेत ते मोकळे फिरताहेत
पोलिसांना फ्री हॅण्ड दिला तर पोलीस चमत्कार करू शकतात, इतका आपला मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे, मात्र आजचे सरकार पोलिसांना स्वातंत्र्य न देता नको तिथे पोलिसांचा बंदोबस्त लावत आहे. ज्यांना गरज नाही त्यांना संरक्षण दिले गेले आहे आणि ज्यांना टिपायला पाहिजे ते मोकळे फिरत आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचे कौतुक करतानाच महायुती सरकारचाही समाचार घेतला.
शिवसेना समाजासाठी काम करतेय, पण शिवसेनेचे आंदोलन होऊ नये म्हणून राज्यकर्ते पोलिसांचा वापर करत आहेत. पाण्यासाठी आंदोलन होऊ नये म्हणून पोलिसांचा वापर करणार असतील तर मग पोलिसांनी काय करायचे?