नालायक गद्दाराला एक रुपयाही भाव मिळता कामा नये, कचऱ्यात फेकून द्या! जिजाऊंच्या बुलढाण्यात उद्धव ठाकरे कडाडले

एक किलो कचरा उचलायला 35 रुपये दिले जातात आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीनला किलोमागे फक्त 30 रुपये. मिंधे सरकारकडून सोयाबीनला कचऱ्यापेक्षाही कमी दर दिला जातोय. मग बुलढाण्यातला मिंध्यांचा गद्दार करतोय काय? त्या गद्दाराला एक रुपयाही भाव मिळता कामा नये, कचऱ्यात फेकून द्या. त्या नालायकाला एकही मत मिळणार नाही इतक्या निष्ठेने मशालीला मतदान करा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कडाडले.

महाविकास आघाडीच्या बुलढाण्याच्या उमेदवार जयश्री शेळके, मेहकरचे उमेदवार सिद्धार्थ खरात आणि परतूरचे उमेदवार ए. जे. बोराडे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या प्रचंड सभा झाल्या. या सभांना तुफान गर्दी उसळली होती. यावेळी भाजप, अजित पवार गट आणि गद्दार मिंधेंवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला.

जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाण्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील मिंधे गटाचे आमदार व विधानसभेचे उमेदवार संजय गायकवाड यांचा चांगलाच समाचार घेतला. लोकसभेत आपण इथली जागा थोडक्यासाठी गमावली, पण आता विधानसभेत गद्दाराला गाडायचा म्हणजे… असे उद्धव ठाकरे म्हणताच उपस्थितांनी, गाडायचाच…असा प्रतिसाद दिला. इतका जोरदार आवाज द्या की गद्दार नकली दातासकट पळून गेला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणताच पुन्हा एकदा, गाडायचाच….असा जोरदार आवाज घुमला.

शिवसेनेशी गद्दारी करण्यासाठी प्रत्येक गद्दाराने 50 खोके घेतले होते. आता ते 50 कोटी म्हणजे त्यांना चिल्लर वाटत असेल. कारण गद्दारांनी त्यांची घरे इतकी भरलीत की पुढच्या पिढय़ांना ददात नाही. आता न केलेल्या कामांचा गवगवा करत सुटलेत, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले. लोकसभेत मशालीचा प्रचार करायला कमी वेळ मिळाला होता. अनेकांनी चुकून धनुष्यबाणाला मते दिली होती. कारण जुनीच निशाणी त्यांच्या डोक्यात होती म्हणून. पण आता तसे होणार नाही. मशाल प्रत्येकाच्या हृदयात धगधगतेय आणि या गद्दारांकडे सर्व चोरीचेच आहे हेसुध्दा सर्वांना कळतेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपला प्रचारासाठी बाहेरून माणसे आणावी लागतात

शिवसेनेला प्रचारासाठी कधीच बाहेरची माणसे आणावी लागली नाहीत. भारतीय जनता पक्षाला मात्र बाहेरून माणसे आणावी लागताहेत. परवा तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री विदर्भात फिरवले. एक रहेंगे तो सेफ रहेंगे, बटेंगे तो कटेंगे म्हणाले. असे कोण काटणार आहे. कटेंगेची बात करणारा बुलढाण्यातल्या गद्दारालाच आता आम्ही भुईसपाट करणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

योगीजी, एकीची व्याख्या आम्हाला शिकवू नका

योगीजी, पहिले तुमच्या महायुतीमध्ये बघा. तुम्ही बोलून गेल्यानंतर गुलाबी जॅकेटवाले अजित पवार म्हणाले बाहेरच्या लोकांनी इकडे येऊन लुडबूड करू नये, आम्हाला शिकवू नये. मग एकीची व्याख्या कुणाला शिकवता असा सवाल उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना उद्देशून केला.

म्हणूनच न्यायासाठी जनतेच्या न्यायालयात

राज्यपालांनी बोलावलेले अधिवेशन बेकायदा होते, आमदारांनी केलेले पक्षांतर कायद्याला धरून नव्हते, असे न्यायालयानेच म्हटले आहे. तीन सरन्यायाधीश बदलले तरी न्याय मात्र अजून मिळालेला नाही, म्हणून आम्ही आता न्याय मागण्यासाठी जनतेच्या न्यायालयात आलो असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

अठरापगड जातीजमाती भगव्याच्या पाठीशी

आम्ही सर्व एकत्र आहोत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्व सोबत आहेत. विशेष म्हणजे बारा बलुतेदार समाज शिवसेनेसोबत आहे. अठरापगड जातीजमातींमध्ये विखुरलेला समाज छत्रपती शिवाजी महाराजांसोबत उभा राहिला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तो अठरापगड समाज आज शिवसेनेच्या सोबत आहे. या अठरापगड जातीजमाती भ्रष्टाचाऱ्यांना गाडण्यासाठी भगव्याच्या पाठीशी उभ्या राहिल्यात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सरन्यायाधीश निवृत्त झाले पण आम्हाला न्याय काही मिळाला नाही

देशाचे सरन्यायाधीश आज निवृत्त झाले. पण आपल्याला न्याय काही मिळाला नाही. दोन अडीच वर्षांपासून नुसत्या तारखाच मिळताहेत. देशात न्याय अस्तित्वात आहे की नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. संविधान बदलणार हा खोटा प्रचार असल्याचे भाजप पंठशोष करून सांगते आहे. मग याच संविधानाच्या आधारे आम्हाला न्याय का मिळाला नाही, असा सवालही त्यांनी केला.

भाजपवाल्यांची तंगडी खेचून महाराष्ट्राबाहेर भिरकावून देणार

भाजपवाले चोर, दरोडेखोरांना घेऊन आमच्या अंगावर चालून येताहेत. शिवसेनेने साथ दिली नसती तर नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नसते. हिंदुत्वाचा भ्रम निर्माण केल्याने शिवसेना भाजपच्या मागे गेली, पण दिल्लीत पोहोचल्यानंतर लाथा मारता. ठीक आहे. तुमची तंगडी खेचून महाराष्ट्रातून भिरकावून दिले नाही तर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

बहीण फक्त निवडणुकीपुरती लाडकी होऊन चालत नाही, तिचा नवरा नोकरीला आहे का, तिच्या मुलांना शिक्षण मिळतेय का हे पाहणेही गरजेचे आहे आणि दीड हजारात घर चालते का? – उद्धव ठाकरे